
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी केलेल्या भाषणातील दोन वेगळे भाग एकत्र करून दाखवलेल्या पॅनोरमा एपिसोडबद्दल बीबीसीने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, ट्रम्प यांनी मागितलेली नुकसानभरपाई देण्यास बीबीसीने नकार दिला आहे.
बीबीसीने म्हटलं की, या एडिटमुळे ‘ट्रम्प यांनी थेट हिंसाचारासाठी आवाहन केलं’ असा चुकीचा अर्थ लागला. त्यामुळे हा २०२४ चा कार्यक्रम पुन्हा दाखवला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रम्प यांच्या वकिलांनी इशारा दिला आहे की, बीबीसीने आपली चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली नाही आणि नुकसानभरपाई दिली नाही, तर ते बीबीसीवर १ अब्ज डॉलर्सच्या नुकसानीचा दावा दाखल करतील.
या वादानंतर रविवारी (९ नोव्हेंबर) बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेव्ही आणि न्यूज सीईओ डेबोरा टर्नेस यांनी राजीनामा दिला होता.
बीबीसी न्यूजने या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व्हाइट हाऊसशी संपर्क साधला आहे.
दिलगिरी जाहीर करण्याच्या काही तास आधीच, डेली टेलिग्राफने २०२२ मध्ये न्यूजनाइटवर दाखवलेला असाच संपादित केलेला दुसरा व्हीडिओ समोर आणला होता.
गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी प्रसिद्ध झालेल्या करेक्शन्स अँड क्लॅरिफिकेशन्स विभागात बीबीसीने सांगितलं की, ट्रम्प यांच्या भाषणाचे एडिटिंग चुकीचं झाल्याच्या टीकेनंतर पॅनोरमा कार्यक्रमाची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली.
बीबीसीने म्हटलं, “आमच्या एडिटमुळे (संपादन) असं वाटलं की, आम्ही ट्रम्प यांचं भाषण एकाच सलग भागात दाखवत आहोत. प्रत्यक्षात ते वेगवेगळ्या ठिकाणचे तुकडे होते. यामुळे चुकीचा संदेश गेला की, ट्रम्प यांनी थेट हिंसाचाराचं आवाहन केलं.”




