
देशातील नामवंत शिल्पकार राम सुतार यांना शुक्रवारी (14 नोव्हेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अॅड. आशीष शेलारही उपस्थित होते.
“जीवनाचे खरे शिल्पकार ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार”, अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , “महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करताना आनंद होत आहे. त्यांनी जगामध्ये भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे.”
“त्यांनी अतुलनीय प्रकारची शिल्पे तयार केली आहेत. जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् ते सरकारी नोकरी व नंतर पुरातत्व खात्यात शिल्प जोडण्याचे आणि शिल्प निर्माण करण्याचे काम राम सुतार यांनी केले”, असे सांगून त्यांच्या जीवनाचा प्रवास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला.
“ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी जवळ जवळ 77 वर्षांच्या कारकिर्दीत हजारो शिल्प तयार केली, देशातले असे कुठले राज्य नाही की, जिथे राम सुतार यांनी तयार केलेले शिल्प नाही. जगातील किमान 15 देशांमध्ये राम सुतार यांनी तयार केलेली शिल्प अभिमानाने उभी आहेत. ज्या दगडाचे ते शिल्प तयार करतात, त्याला आकार देतात, त्याला प्रतिरूप देतात, तेव्हा त्या शिल्पातून ती व्यक्ती प्रत्यक्ष साकार होते”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
शिल्पकलेतील ‘किमयागारा’चा सन्मान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “शिल्पकलेसारख्या काहीशा अवघड कलेला आपल्या परिसस्पर्शाने नवीन आयाम मिळवून दिलेल्या सुतार यांचे या क्षेत्रातील योगदान निव्वळ अतुलनीय आहे. आपल्या शिल्पकलेने देशातील अनेक दिग्गज नेते, महापुरुष तसेच अनेक प्रभृतींची शिल्पे त्यांनी घडवली. आजवरच्या मूर्तिकलेतून साकारलेल्या शिल्पकृतींमधून त्यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल.” त्यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने या पुरस्काराचे भूषण वाढले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुतार यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केली.
पवार म्हणाले, “मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि 25 लाखांचा धनादेश असं स्वरूप असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचा हा सन्मान हा राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आदर, प्रेम आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या इतिहास, कला आणि सांस्कृतिक वैभवाला अधोरेखित करणारा हा सन्मान राम सुतार यांच्या कार्याचा अभिमानपूर्वक गौरव करतो. त्यांच्या अद्वितीय कलाकृतींसाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो.”




