चौकीत हजर झाला, दुसऱ्या दिवशी संपवलं आयुष्य, मयुरच्या कपड्यात सापडली चिट्ठी, पुण्यातील भोरमधील प्रकरणात मोठी अपडेट…

SHARE:

भोर : भोरमध्ये एका तरुणाच्या आत्महत्येनंतर तब्बल ४८ तासांनी उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. १९ वर्षीय मयूर खुटे या तरुणाने पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी मयूरला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) व नागरी हक्क संरक्षण कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर उपनिरीक्षक चव्हाण यांची पुणे मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

मयूर खुटे या १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी भोर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक अनिल चव्हाण, संदीप सुतार आणि स्वप्नाली सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उपनिरीक्षक चव्हाण यांनी मयूरला पोलिस ठाण्यात बोलावून काठी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत मयूरच्या अंगावर वळ उठले होते. वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. मयूरला इतकी मारहाण झाली होती की त्याला चालणेही कठीण झाले होते.

आत्महत्येपूर्वी मयूरने एक सुसाइड नोट लिहिली होती.

शवविच्छेदनादरम्यान त्याच्या कपड्यांमध्ये ही नोट सापडली. या नोटमध्ये त्याने अनिल चव्हाण आणि संदीप सुतार यांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. या घटनेनंतर मयूरच्या नातेवाईकांनी आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी आणि उपनिरीक्षक चव्हाण यांना निलंबित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी आंदोलकांशी संवाद साधून तपास करून तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर मयूरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंग गौर पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा