
पुणे : पुणे शहरातून आताच्या घडीची सर्वात मोठी आणि वेदनादायी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या हिंजवडी येथे खासगी बसने ५ शाळकरी मुलांना चिरडलं आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्य उपचार सुरु आहेत. या घटनेत दोन सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पुण्यात सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत.
पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी ही नित्यनियमाची आहे. तसेच इथे अपघाताच्या घटनांचे प्रमाण देखील वाढले आहेत. आजदेखील संध्याकाळच्या सुमारास अशाच प्रकारे एक अपघाताची घटना घडली आहे. या अपघाताची तीव्रता मोठी आहे. कारण या अपघातात एका खासगी बसने पाच शाळकरी मुलांना अक्षरश: चिरडलं आहे. यापैकी २ शाळकरी मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. तर ३ मुलं जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खासगी बस ही एका आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी होती. ही बस पंचरत्न येथे आल्यानंतर अचानक तिचा टायर फुटला. त्यामुळे ही बस अनियंत्रित झाली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला लागून चालत जाणाऱ्या चार ते पाच जणांना चिरडत जावून पुढे ही बस थांबली. या दुर्दैवी घटनेत सख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे.
पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात नुकताच भीषण अपघात
विशेष म्हणजे पुण्यात काल एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली होती. एका मद्यधुंद आयटी इंजिनियरने हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा जीव गेला. पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील पबमध्ये गेलेला हा इंजिनियर तराट होऊन बाहेर पडला तेव्हा त्याला चालता सुद्धा येत नव्हते. त्याला पबच्या कर्मचाऱ्यांनी इतर दुसऱ्या गाडीने जाण्याची विनंती केली होती. गाडी चालवून न जाण्याची विनंती केली होती. पण त्याने ऐकलं नाही. त्याने गाडी सुरु केली आणि एका तरुणाला जोराची धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला.




