
नागपूर : “रवींद्र चव्हाण आणि माझे कधीही शत्रुत्व नव्हते. ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणेच आहेत. आज मला त्यांनी बोलावून घेतले. ते ज्येष्ठ आहेत. त्यामुळे मी जाऊन त्यांना भेटलो”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी सोमवारी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यातील संघर्षाची राज्यभर चर्चा झाली. राणे यांनी चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचे थेट आरोप केले होते. यानंतर चव्हाण यांनीदेखील आरोप फेटाळत राणेंना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर सोमवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद बघायला मिळाला.
रविंद्र चव्हाण यांनी राणेंच्या गळ्यात हात टाकत बातचीत केली. या दिलजमामुळे दोघांमधील वाद संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीबाबत चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, राणे यांनी प्रतिक्रिया दिली. “रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. आज त्यांनी बोलावल्यामुळे जाऊन भेटलो. त्यांचा आशीर्वाद घेतला. आमच्यात कधीही टोकाचा वाद झाला नाही. निवडणुकीच्या काळात जे बोलायचे होते जे नजरेसमोर आले ते पुरावे मी निवडणूक आयोगासमोर दिले आहेत”, असं निलेश राणे म्हणाले.
“भाजप किंवा रविंद्र चव्हाण यांच्याबाबत माझी वैयक्तिक काही तक्रारच नाही. मी रविंद्र चव्हाण यांचे नाव घेतले आणि पुरावा दाखवला. तो पुरावा मी निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. एका बोगस ओबीसी प्रमाणपत्रावर रिट पिटिशन दाखल केले. त्यांचा अहवाल आला की मी प्रतिक्रिया देईन”, अशीदेखील भूमिका निलेश राणे यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, निलेश राणे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी भाजपच्या एका नेत्याच्या घरी धाड टाकली होती. त्यांनी संबंधित नेत्याच्या घरात पैसे असल्याचा दावा केला होता. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या भाजप नेत्याच्या घरी जावून भेट घेतली होती. भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वाटप केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे त्यांनी एक गाडी देखील पकडली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील संघर्षाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. पण आता निलेश राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित झाल्याचं बघायला मिळालं आहे.




