
मुंबई – राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही काही भागात पाऊस आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यात थंडीची लाट असून उत्तरेकडून थंडगार वारे राज्यात येतंय. यामुळे पारा सातत्याने खाली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक आहे. पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीच्या मोठ्या लाटेचा इशारा देण्यात आला. याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला.
उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. तीन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. किमान तापमान १५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २२.२ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ केंद्रात १८.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
सोमवारी सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली. यवतमाळ येथे ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल गोंदिया ९ अंश सेल्सिअस, अमरावती ९.६ अंश सेल्सिअस, नांदेड ९.९ अंश सेल्सिअस, मालेगाव ९ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता.
विदर्भात सातत्याने आता थंडी झपाट्याने वाढताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी थंडीच्या लाटेचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ८, ९ , १० आणि ११ डिसेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा जारी केला आहे. तीव्र थंडी पडेल. विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशातील काही ठिकाणी थंडीची लाट आहे.




