
मुंबई – मराठी सेलिब्रिटी आणि राजकारण, हे समीकरणं तसं सर्रास पाहायला मिळतं. अनेक सेलिब्रिटी अभिनयासोबतच राजकीय क्षेत्रातही अनेक पक्षांसाठी काम करतात. पक्षांच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ते पार पाडतात. अशातच आता मराठी सिनेसृष्टीतली क्युट अभिनेत्री सायली संजीव राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सायली संजीव राज ठाकरेंची मोठी फॅन आहे. अनेकदा मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकांशी सहमत असल्याचं सायली संजीवनं जाहीरपणे सांगितलं आहे. अशातच आता ती राजकारणात येणार असल्याच्या रंगलेल्या चर्चा आणि तिला राज ठाकरेंचे पटणारे विचार, यावरुन सायली मनसेत तर प्रवेश करणार नाही ना? असंही बोललं जात आहे. पण, आता राजकीय इनिंगबाबत रंगलेल्या चर्चांवर सायली संजीवनं भाष्य केलं आहे.
सायली संजीव राजकारणात एन्ट्री करणार?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सायली संजीवनं ती राजकीय इनिंग सुरू करणार असल्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. सायली संजीव म्हणाली की, “मी अजून असं काही ठरवलेलं नाही. मला राजकीय विश्लेषक म्हणून काम करायला खूप आवडेल. मला एखाद्या पक्षात सक्रीय काम करत राहण्यापेक्षा मला संपूर्ण राजकारणाचं विश्लेषण करायला फार मजा येईल…”
‘तरुण भारत’ ला दिलेल्या मुलाखतीत सायली संजीव म्हणाली, “२००९ पासून मला राजकारणाची गोडी निर्माण झाली आहे. राज साहेबांनी मनसेची स्थापना केली त्यावेळी मी वाढत्या वयात होते. माझ्या वाढत्या वयात मी त्यांची भाषणे ऐकली. त्यामुळे माझ्यावर त्यांचा खूप जास्त प्रभाव पडला आहे. राज ठाकरेंची मी फॅन आहे. मला त्यांच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतात. कलाक्षेत्रासह इतर सर्वच क्षेत्रांबाबत त्यांना खूप माहिती असतं. राज ठाकरे हे एक उत्तम वाचक आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून मला खूप ज्ञान मिळतं”.
मराठी भाषेबाबत बोलताना सायली संजीव म्हणाली, “आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आपण मान ठेवला तर बाकीचे लोक मान ठेवतील. आपण समोरच्या व्यक्तीसोबत त्याच्या भाषेतच आधी बोलायला लागलो तर आपली भाषा कोणाला कळणार नाही. आपली भाषा टिकवणं ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. आपण स्वत:पासून याची सुरुवात केली पाहिजे…”
दरम्यान, मराठीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या तिचा आगामी सिनेमा ‘कैरी’ मुळे चर्चेत आहे. सायलीचा आगामी सिनेमा १२ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सायलीनं ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक मराठी सिनेमे केले. पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, मन फकीरा, सातारचा सलमान, एबी आणि सीडी, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची, बस्ता, गुलमोहर, परफेक्ट पती, शुभमंगल ऑनलाईन यांसारख्या सिनेमांमधून सायली संजीव प्रेक्षकांच्या भेटीला आली.




