
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक येथे धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून अपमानित केल्याने पतीनेच गाढ झोपेत असलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली आहे. सात डिसेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली. लक्षमी पवन धुंदाळे (वय वर्ष २४ , रा. उटी बुद्रुक) असे मृतक महिलेचे नाव आहे. लक्ष्मी ही रात्री घरामध्ये झोपेत असताना तिचा पती पवन गजानन धुंदाळे (वय वर्ष २८ ) याने तिच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार केले. तू काही कामाचा नाहीस, बाहेर जा आणि मरून जा असे शब्द बोलून पत्नीने अपमानित केल्याचा राग त्याच्या मनात होता. या कारणावरून हे सर्व घडल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पतीने केलेल्या मारहाणीत लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ग्राम पोलीस पाटील संदीप सदाशिव गटमने यांनी ०८ डिसेंबर रोजी सकाळी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून आरोपी पवन धुंडाळे यांच्या विरुद्ध भारतीय संहिता कलम १०३ ,(१ ) अनुसार कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करीत आहे.
मध्यरात्री नंतर सासऱ्यांनी दिली गावात माहिती…
घटना घडल्यानंतर आरोपीचे आई-वडील घाबरून घराबाहेर पडले आणि थेट पोलीस पाटील संदीप गटमने यांच्या घरी जाऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. जळगाव जामोद पोलीस ठाण्याला कळविले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली.
निष्पाप जीवाचे हाल..
दरम्यान, मृत लक्ष्मी धुंदाळे आणि आरोपी पवन धुंदाळे हे दोघेही शेतमजूर करून कुटुंबाचा उदार विवाह करत होते. सध्या संसारात दिवस कठीण दिवस जाणाऱ्या या दाम्पत्याला अवघ्या ७ महिन्याची चिमुकली मुलगी आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे त्या बाळाचे मातृछत्र हरपले आहे. कोवळ्या जीवाचं काय दोष असा सवाल गावात व परिसरात जनमानसातून उपस्थित केला जात आहे.




