पत्नीला लढवू द्या, चिरंजीव नको; भाजपकडून कोंडी, शिवसेना नेते धंगेकरांचा मोठा निर्णय, म्हणाले आमच्या रक्तात…

SHARE:

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घटिका दीड दिवसावर येऊन ठेपली असतानाही महायुतीचे घोडे अडलेलेच आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीच्या जागावाटपाचा पेच कायम असल्याने, शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी संयम सोडून थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून, अनेक इच्छुकांनी आज, सोमवारी शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, शिवसेना २५ जागांवर ठाम असून, भाजपने अवघ्या पंधरा जागा देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणूक एकत्रित लढविण्याची घोषणा केलेल्या महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठकीत जागावाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता आहे. त्यानुसार, या बैठकांचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते; परंतु तोडगा न निघाल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम कायम आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची वाट न पाहता अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रचारयात्रा काढून मतदारांना साद घालून शक्तिप्रदर्शन करून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

धंगेकरांची कोंडी; मुलगा अपक्ष लढणार?
महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांची कोंडी केली जात आहे. महायुतीत प्रभाग २४ मध्ये (कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल) धंगेकर यांच्या पत्नीसाठी जागा सोडण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे; परंतु त्यांचे चिरंजीव प्रणव यांच्यासाठी जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रणव धंगेकर अपक्ष लढण्याची चर्चा आहे.

‘भाजपकडून शिवसेनेला निवडून येण्याची शक्यता नसलेल्या जागांचा प्रस्ताव दिला आहे. उमेदवार आणि जागाही तेच ठरवीत असल्याने, शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. माझ्या मुलाने निवडणूक लढविण्याचा ठाम निर्णय घेतला असून, लढणे धंगेकरांच्या रक्तात आहे,’ असे सांगून रवींद्र धंगेकर यांनी याबाबतचे संकेत दिले.

महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा होणार आहे. या बैठकीत महायुतीबाबत अंतिम निर्णय होईल. त्यानुसार, पक्षाची भूमिका जाहीर होईल. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घटिका जवळ आल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पक्षाने सर्व इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे.
– रवींद्र धंगेकर, महानगरप्रमुख, शिवसेना

Leave a Comment