
पुणे: पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या उमेदवारांवरुन भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टिका केली. पुणे गुन्हेगारी मुक्त करण्याचा दावा करणाऱ्या अजित पवारांनी “पालकमंत्री एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे शहराच्या पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत त्यांचे उमेदवार पाहिले तर ते कोणत्या तत्वात बसत” असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत. मोहोळ यांच्या या टीकेला भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलेल्या अमोल बालवडकारांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत उत्तर दिलं आहे. गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या गुन्हेगारांचा “आका” बाजूला घेऊन बसणाऱ्या व केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या सुसंस्कृत पुणे शहराच्या खासदारांनी आमचे नेते अजित दादा पवार यांना राजकारण शिकवू नये. तुमच्या “काठावर” निवडून येण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ही वाटा आहे हे विसरू नका, असं अमोल बालवडकर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमधे म्हटलं आहे.
“गरज सरो वैद्य मरो” अशी तुमची नेहमीची भूमिका योग्य नाही….
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल बालवडकर यांच्याकडून निलेश घायवळ परदेशात पसार होण्याबद्दल अप्रत्यक्षरित्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर टिका करण्यात आली आहे. गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या गुन्हेगारांचा “आका” बाजूला घेऊन बसणाऱ्यां व केवळ मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या सुसंस्कृत पुणे शहराच्या खासदारांनी आमचे नेते अजित दादा पवार यांना राजकारण शिकवू नये. तुमच्या “काठावर” निवडून येण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ही वाटा आहे हे विसरू नका. “गरज सरो वैद्य मरो” अशी तुमची नेहमीची भूमिका योग्य नाही. माझे नेते अजित दादांवर यापुढे बोलल्यास जसाच तसे उत्तर देण्यात येईल. जय जिनेंद्र !
भाजपचा मास्टरस्ट्रोक! रात्रीतून अमोल बालवडकरांचा पत्ता कट अन्…
पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊची सध्या शहरात चर्चा सुरु आहे. या प्रभागात भाजपने अमोल बालवडकर यांचं तिकीट नाकारलं आणि थेट त्यांच्याच भावकीत असलेल्या लहू बालवडकर यांना दिलं. मात्र अगदी शेवटच्या क्षणी लहू बालवडकर यांना भाजपने उमेदवारी का दिली असावी?, असा प्रश्न निर्माण होतोय. पुण्यात भाजपने शेवटपर्यंत उमेदवार यादी जाहीर केली नाही. महायुती होणार की नाही यावर अजूनही प्रश्न चिन्ह आहेच. रात्रीतून भाजपने लहू बालवडकरांचं नाव का समोर केलं हाही प्रश्न आहे.
भाजपने शेवटपर्यंत उमेदवार यादी गुलदस्त्यात ठेवली. त्याचं कारण फार सोपं होतं ते म्हणजे पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी आणि त्या क्षणी तयार झालेला रोष. अमोल बालवडकरचं नाव पहिल्याच यादीत आहे. त्यांना एबी फॉर्म दिलाय अशा चर्चा सुरु होत्या. मात्र भाजपच्या पुण्यातील नेत्यांमध्ये विधानसभेच्यावेळी अमोल बालवकरांनी आमदारकीसाठी धरलेला हट्ट आणि त्यांची काढलेली समजूत ही समोर होतीच. त्यामुळे त्यांना बाजूला सारुन भाजपने मास्टरस्ट्रोक देण्याचं ठरवलं. भाजपने शेवटच्या रॅमी ग्रॅंड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आणि त्यातला महत्वाचा निर्णय हा लहू बालवडकरांना उमेदवारी देण्याचा होता. अखेर पहाटे लहू बालवडकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.
लहू बालवडकरांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि कामात सक्रिय झाले. सोबतच त्यांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत सक्रिय काम केलं. त्यानंतर त्यांना कोथरुडमधून मंडल अध्यक्ष पद भाजपनेच देऊ केलं. त्यांची आतापर्यंत असलेली निष्ठेमुळे आणि कामामुळे भाजपने उमेदवारी दिली.सोबतच यंदा भाजपला जुन्या उमेदवारांना अनेक ठिकाणी उमेदवारी द्यायची नव्हती. सुरुवातीला स्टॅंडिंग उमेदवारांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र ४२ माजी नगरसेवकांच्या तिकीट भाजपने कापले आणि त्यातच लहू बालवडकरला संधी दिली. भाजपने यंदा तरुणांना पुढे करण्याचं निश्चित केलं होतं. त्यात लहू बालवडकर अव्वल चेहरा भाजपला दिसला. त्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी दिली.




