
नाशिक : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत महापौर कोण होणार यावरुन चर्चा सुरू असताना ठाकरेंना उद्देशून भाजपकडून टीका केली जात आहे. मतांसाठी विचारधारा सोडली, मुंबईमध्ये ठाकरेंकडू खान नावाचा महापौर होईल, असेही डिवचले जाते. मात्र, मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने चार मुस्लिम समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यावरुन, आता विरोधकांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज मालेगाव निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी सफाईदारपणे उत्तर दिले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वच समाजात पॉझिटिव्ह मत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकासकामामुळे सर्वजण सोबत येत आहेत. तर, भाजप सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे, मालेगाव महापालिकेत देखील विविध जाती धर्मातून उमेदवारी मागण्यासाठी अर्ज आले होते. त्यानुसार, ज्या त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला संधी देता येईल, तशी संधी देण्याचे काम भाजपाने केले, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हटले.
मालेगाव महापालिका निवडणूक प्रचार सभेच्या निमित्ताने मालेगावात आलेल्या रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल ताशा, संबळ व हलगी या पारंपारिक वाद्याच्या तालावर बैलगाडीवरून रोड शो करीत मतदारांना भाजपला मतरुपी दान करण्याचे आवाहन केले. यावेळी मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार उपस्थित होते. रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांनी मालेगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेला संबोधित केले.
मालेगावात भाजपचे २२ उमेदवार
मालेगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. भाजप पदाधिकाऱ्यांचे यापूर्वी वेगवेगळे तोंडे होते. आता, मात्र सर्वजण एकत्रित आहेत. त्यामुळे भाजपाने जेव्हढ्या जागा दिल्या आहेत त्या सर्वच सर्व जागा महापालिका निवडणुकीत निवडून आणा आहे, असे आवाहनही गिरीश महाजन यांनी केले. येणाऱ्या काळात मालेगाव महापालिकेवर भाजपचा महापौर बसवायचा आहे, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने २२ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत, त्यांच्या प्रचारार्थ आज येथे जाहीर सभा पार पडली.
मालेगावनंतर रविंद्र चव्हाण यांनी धुळ्यातही प्रचारानिमित्ताने दौरा केला. यावेळी,श्री एकवीरा देवीची महाआरती त्यांच्याहस्ते करण्यात आली. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १०१ नारळ वाढवून भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.
गत निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष
उत्तर महाराष्ट्रातील सुमारे ११०० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची मालेगाव महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक मानली जाते. आगामी निवडणुकीत २१ प्रभागांमधून ८४ नगरसेवक निवडले जाणार असून, त्यासोबत पाच स्वीकृत सदस्य असतील. त्यामुळे सत्तेची गणिते अधिकच रंजक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, गत २०१७ च्या निवडणुकीत येथे काँग्रेसने २८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने २६ जागा जिंकल्या होत्या, यंदा भाजपने येथे रणशिंग फुंकले आहे.




