इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान…

SHARE:

मुंबई – आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, इथं कसलं हिंदू मराठी लावलं जात आहे. हा महाराष्ट्र असून महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदू मराठी प्रचारावरून फटकारले. पेशव्यांच्या काळात मराठेशाहीने बडोदा साम्राज्य उभं केलं, तेव्हा तिथले सगळे महापौर गुजरातीच का होते? हा महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच असणार, असेही राज म्हणाले.

विकासकामे अडवून तरी दाखवा
वचननामावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या योजना राबवू इच्छितो, पण त्यासाठी राज्य किंवा केंद्राची परवानगी लागते आणि ती दिली जात नाही, तेव्हा अडवून तरी दाखवा, असा गर्भित इशारा दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राज उत्तर देत असताना हस्तक्षेप करत म्हणाले, यांना विकासकामे अडवू तरी द्या, यांचं ढोंग तरी समोर येऊ द्या.

ते उद्या दामदुपटीने पुढे वापरले जातील
राज ठाकरे म्हणाले की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही. सध्या सत्तेत असलेल्यांना आपण कधीच सत्तेबाहेर जाणार नाही, असा गैरसमज झाला असेल, तर तो भ्रम लवकरच दूर होईल. आज सत्तेत आहोत म्हणून काँग्रेसने पूर्वी जे केलं तेच आम्ही करतोय, अशी कारणे देणे धोकादायक असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले की, आज तुम्ही जे चुकीचे पायंडे पाडत आहात, ते उद्या दामदुपटीने पुढे वापरले जातील. त्यावेळी तक्रार करण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांकडे राहणार नाही. राज्यकर्त्यांनी आपल्या कृतीतून लोकशाहीला धक्का तर बसत नाही ना, याचे भान सुटता कामा नये, असेही त्यांनी बजावले.

मग भाजपची भूमिका नेमकी काय आहे?
राज ठाकरे यांनी बिनविरोध पायंड्यावरही सडकून प्रहार केला. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये अशाच बिनविरोध निवडणुकांविरोधात भाजप थेट सुप्रीम कोर्टात गेला होता. आता महाराष्ट्रात घडणाऱ्या या प्रकारांबाबत भाजपची भूमिका नेमकी काय आहे? यावर त्यांनी स्पष्टपणे बोलावे, अशी मागणीही त्यांनी केली. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राला युपी-बिहारसारखं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे, देशाला दिशा देणारा राज्य आहे. अशा महाराष्ट्राचं वाटोळं करणं हे घातक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment

अधिक वाचा