
ठाणे : पीढी नासवणारे ड्रग्जचे व्यापारी ठाण्यात तयार झाले असून ठाण्याची ओळख आता ड्रग्जचे शहर अशी होत आहे, त्याचे कनेक्शन साताऱ्यात आहे असं म्हणत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर इथल्या रस्त्यांवर त्यांना ठोकून काढू असंही संजय राऊत म्हणाले. गद्दारांचे शहर अशी झालेली ठाण्याची ओळख आपल्याचा पुसायची आहे असं म्हणत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.
मुंबईसह ठाण्यातंही महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली. आधी ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी वचननामा जाहीर केला तर आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत ठाण्याचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. संजय राऊत, राजन विचारे, अविनाश जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रकाशित केला.
ठाणे ड्रग्जचा अड्डा बनलाय
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबईत नंतर ठाण्याकडे लागले आहे. आज आपण ठाण्याचा वचननामा प्रसिद्ध केला, काल राज ठाकरे शिवसेना भवनात आले होते. ज्या नगरपालिकेने शिवसेनाला पहिली सत्ता दिली ते हे ठाणे. आज ठाण्याची परिस्थिती आपण सर्वजण पाहतो, पण आता ठाणे हा ड्रग्जचा अड्डा झाला आहे. ठाणे हे मंदिर आणि तलावाचे शहर ओळखले जायचे, पण आता ड्रग्ससाठी ओळखले जाते. ठाण्यात अडीच कोटींचे ड्रग्स मिळाले, पानटपऱ्या आणि सगळीकडे ड्रग्ज मिळते.”
संजय राऊत पुढे म्हणाले की, “ठाण्याचे लयारी झाले आहे का? धुरंधरमध्ये रहमान डकैत आहे तसा ठाण्यातदेखील एक डकैत आहे. इथल्या ड्रग्जची लिंक साताऱ्यात पोहोचली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या नातेवाईकांच्या दारात तो कारखाना सापडला. पीढी नासवणारे ड्रग्जचे व्यापारी इथे आहेत. ते सर्व विषयावर बोलतात, मग यावर पण त्यांनी बोलले पाहिजे. बीडपेक्षा पुढे ठाणे गेले आहे. ठाणेकरांनी याच विषयावर मतदान करायला हवे.”
आनंद दिघे म्हणजे ठाणे
संजय राऊत म्हणाले की, “आज ठाण्याची ओळख गद्दारांचे शहर अशी आहे. एका माणसामुळे गद्दारांचे ठाणे शहर अशी ओळख झाली, जी आम्हाला पुसायची आहे. त्यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर या रस्त्यावर आम्ही त्यांना ठोकून काढू. पंधरा मिनीट पोलीस बाजूला करा, मग बघा आम्ही काय करतो.”
एकनाथ शिंदे राजकारणात नव्हते तेव्हा ठाण्यात शिवसेनेचे सत्ता आली होती. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही, तर आनंद दिघे म्हणजे ठाणे. आजही बाळासाहेबांच्यानंतर आनंद दिघे यांचे ठाणेकरांवर राज्य आहे असं संजय राऊत म्हणाले.
येत्या २१ तारखेला चिन्हाचा निकाल आहे, तो निकाल आमच्या बाजूने लागेल म्हणून तारीख पुढे ढकलली जात आहे. त्यावर या लोकांनी ४ निवडणुका काढल्या अशा शब्दात राऊत यांनी शिंदेंवर टीका केली.




