नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील १२१ शिक्षणक्रमांच्या हिवाळी परीक्षा आज, बुधवारपासून (दि. ७) सुरू होत आहेत. यापैकी ११, १४, १५ व १६ जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे विद्यापीठाने जाहीर केले आहे. या परीक्षा अनुक्रमे २२, २३, २४ व २५ जानेवारीला होणार आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांच्या सत्र व वार्षिक परीक्षा तसेच मे २०२५ च्या सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या फेरपरीक्षार्थीची लेखी परीक्षा होणार आहे. राज्यभरातील २६९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी १ लाख ४९ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग ‘क’ परीक्षा रविवारी (दि. ११) होणार आहे.
तसेच महापालिका सार्वत्रिक निवडणुकींअंतर्गत १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी असणार आहे. त्यामुळे ११, १४, १५ व १६ जानेवारीला नियोजित विद्यापीठाच्या परीक्षा २२, २३, २४ व २५ जानेवारीला होणार आहेत. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरदार, व्यावसायिक, पोलिस, सैनिक, गृहिणी, शिक्षक, कामगार अशा समाजातील विविध घटकांतील आहेत. या परीक्षेमध्ये विविध विषय मिळून ६ लाख ७९ हजार ९५४ उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत.




