मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. जोरदार विक्रीमुळं बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. सेन्सेक्समध्ये ७८०.१८ अंकांची घसरण होऊन निर्देशांक ८४१८०.९६ अंकांवर बंद झाला.निफ्टी ५० निर्देशांक २६३.९० अंकांच्या घसरणीसह२५८७६.८५ वर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं ८ लाख कोटींचं नुकसान झालं आहे.
शेअर बाजारातील घसरणीमागं प्रमुख कारणं विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्यानं विक्री सुरु आहे. अमेरिकेचं नवं टॅरिफ धोरण आणि भू राजनैतिक संघर्ष ही आहेत. याशिवाय जागतिक बाजाराती कमजोर संकेतांचा परिणाम देखील शेअर बाजारावर दिसून आला.
ब्रॉर्डर मार्केटमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक २ टक्क्यांनी घसरले. सर्व सेक्टोरल निर्देशांक देखील घसरणीसह बंद झाले आहेत. मेटल, ऑईल अँड गॅस, पॉवर, पीएसयू बँक आणि कॅपिटल गुडस क्षेत्रात २ ते ३ टक्के घसरण झाली आहे. या सर्व क्षेत्रातील स्टॉकमध्ये घसरण झाली आहे.
बीएसईवर ७.८३ लाख कोटी रुपये बुडाले
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील कंपन्यांचं बाजारमूल्य ७.८३ लाख कोटींच्या घसरणीसह ४७२.११ लाख कोटींवर आलं आहे. यापूर्वी ते ४७९.९४ लाख कोटींवर होतं. म्हणजेच गुंतणूकदारांचं एका दिवसात ७.८३ लाख कोटींचं नुकसान झालं आहे.
बीएसई सेन्सेक्समधील टॉप ३० पैकी केवळ ४ शेअर तेजीसह बंद झाले. इटरनल, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स च्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, एल अँड टी, टेक महिंद्रा, टिसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टीलच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
बीएसईवर १०३८ शेअर तेजीसह बंद झाले. तर ३१५९ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर, १७० शेअरमध्ये तेजी किंवा घसरण दिसून आली नाही. ११३ स्टॉकनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, १९० शेअरनं ५२ आठवड्यांचा निचांक गाठला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. हे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकानुसार रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्के टॅरिफ लादलं जाईल. अमेरिकेनं हे पाऊल रशिया आणि यूक्रेन युद्ध संपवण्यासाठी उचललं आहे. याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही.)




