पुणे : उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्या सुनेच्या हत्येच्या आरोपाखाली पती आणि सासरच्या मंडळींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, तीच महिला चक्क महाराष्ट्रातील पुण्यात सुखरूप असल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि फिर्यादींच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्याच्या मल्हीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. लक्ष्मणपूर गंगापूर येथील रहिवासी असलेल्या ‘दीपा’ नावाच्या तरुणीचा विवाह ओरीपुरवा गावातील हंसराज याच्याशी चार वर्षांपूर्वी झाला होता. काही महिन्यांपूर्वी (मे २०२५ च्या सुमारास) दीपा अचानक सासरहून बेपत्ता झाली.
दीपा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले. दीपाच्या आईने (मायावती) न्यायालयात धाव घेत दावा केला की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ करून तिची हत्या केली आहे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे.
न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल माहेरच्यांच्या तक्रारीनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, स्थानिक पोलिसांनी पती हंसराज, सासरा परमेश्वर आणि सासू यांच्यासह एकूण सहा जणांवर हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र ‘मृतदेह’ किंवा कोणताही पुरावा हाती लागत नव्हता.
मोबाईल लोकेशनने उलगडले सत्य या प्रकरणाचा तपास सीओ सतीश शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक बाबींची मदत घेतली आणि सर्व्हिलन्सद्वारे दीपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. ‘मृत’ समजल्या जाणाऱ्या दीपाचा मोबाईल नंबर ॲक्टिव्ह होता आणि तिचे लोकेशन उत्तर प्रदेशात नसून चक्क महाराष्ट्रातील पुणे शहरात असल्याचे निष्पन्न झाले.
पुण्यातून केले रेस्क्यू लोकेशन ट्रेस झाल्यानंतर मल्हीपूर पोलिसांचे एक पथक तातडीने पुण्यात दाखल झाले. तिथे शोध घेतला असता दीपा सुखरूप आढळून आली. प्राथमिक चौकशीत समोर आले की, ती आपल्या मर्जीने घर सोडून पुण्यात आली होती आणि इथेच वास्तव्यास होती.
पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा उत्तर प्रदेशात नेले आहे. या शोधामुळे विनाकारण हत्येचा आरोप झेलणाऱ्या सासरच्या मंडळींनी सुटकेचा निश्वास टाकला आहे, मात्र खोट्या गुन्ह्यामुळे कायद्याचा गैरवापर झाल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.




