पालघर : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असताना, बहुतांश ठिकाणी भाजप आणि महायुती सत्तेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. मात्र, मुंबईच्या शेजारील वसई-विरार महानगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसला असून येथे सत्तास्थापना करण्यात पक्ष अपयशी ठरला आहे. विशेष म्हणजे, ना भाजप, ना शिंदेंची शिवसेना, ना ठाकरे, तर एका प्रादेशिक पक्षाने येथे आपले वर्चस्व कायम राखले आहे.
बविआची आघाडी
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीने (बविआ) स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता पुन्हा एकदा आपल्या नावावर केली आहे. ११५ जागांच्या सभागृहात बविआने ७१ जागांवर विजय/आघाडी मिळवत बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. त्यामुळे यंदाही वसई-विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचाच महापौर विराजमान होणार, हे स्पष्ट झाले आहे.
भाजपला या निवडणुकीत ४३ जागांवर समाधान मानावे लागले, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ एकाच जागेवर आघाडी मिळवता आली आहे. ठाकरे गटाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मात्र एकाही जागेवर आघाडी घेऊ शकलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) आणि इतर पक्षांचाही संपूर्ण अपयश झालं आहे.
माजी महापौरांचा पराभाव
दरम्यान, या निवडणुकीत काही बड्या नेत्यांना धक्का बसला आहे. माजी महापौर रूपेश जाधव यांचा त्यांच्या प्रभागातून पराभव झाला आहे. मात्र, माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आपला विजय कायम राखला आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये बविआला मोठा धक्का बसला असून, पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे चुलत भाऊ आणि माजी सभापती पंकज ठाकूर, तसेच माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांचा पराभव झाला आहे.
वसई-विरार महानगरपालिका निकाल
बहुजन विकास आघाडी: ७१
भाजप: ४३
शिवसेना (शिंदे): ०१
शिवसेना (उबाठा): 00
काँग्रेस: ००
राष्ट्रवादी काँग्रेस (SP): ००
राष्ट्रवादी काँग्रेस (AP): ००
वंचित बहुजन आघाडी: ००
इतर (SP, MIM, AAP, BSP): ००




