सुरत – भाजपची सत्ता असलेल्या राज्यांकडून भ्रष्टाचारावर झिरो टॉलरेंस नीतीचा दावा केला जातो. मात्र या दाव्यानंतरही सत्ताधारी भाजपच्या राज्यात भ्रष्टाचाराच्या समोर आहेत किंवा यापूर्वी आल्या आहेत. यातून गुजरात राज्य देखील सुटलेले नाही. आत याच राज्यातून भ्रष्टाचाराचा एक मोठा नमूना समोर आला आहे. सुरतमध्ये २१ कोटी रुपये खर्चून बांधलेली पाण्याची टाकी उद्घाटनापूर्वीच चाचणी दरम्यान कोसळली. चाचणी दरम्यान ही टाकी कोसळल्याने भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या अपघातात तीन कामगार जखमी झाले आहेत.
सुरतच्या कामरेज तालुक्यातील तडकेश्वर गावात ही घटना घडली. यामुळे गावातील स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ माजली आली. पाणीपुरवठा विभागाने बांधलेली ही पाण्याची टाकी १९ जानेवारी रोजी चाचणी दरम्यान कोसळली. ९ लाख लिटर पाणी भरल्यानंतर टंकी कोसळली. यात तीन कामगार जखमी झाले. उद्घाटनापूर्वीच २१ कोटी रुपयांच्या या टाकीचे कोसळणे प्रश्न उपस्थित करत आहे.
टाकीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते. गायपागला गट पाणीपुरवठा योजनेअंतर्गत, तापी नदीतून पाणी आणून या टाकीत साठवले जाणार होते, जे आजूबाजूच्या १४ गावांना पुरवले जाणार होते. त्याची क्षमता ११ लक्ष लिटर होती. टाकी पूर्ण झाल्यानंत, विभागाने त्याची चाचणी सुरू केली. गेल्या दोन दिवसांत, त्यात 9 लक्ष लिटर पाणी भरले गेले होते. मात्र टंकी दाब सहन करू शकले नाही आणि कोसळली. या अपघातात एका महिलेसह तीन कामगार जखमी झाले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, गावकऱ्यांनी सांगितले की टाकी बांधण्यासाठी वापरलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. लोखंड आणि सिमेंटच्या वापरात मोठी त्रुटी असू शकते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, घटनेनंतर सरकारने तात्काळ कारवाई केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, उपकार्यकारी अभियंता जय चौधरी आणि कार्यकारी अभियंता रजनीकांत चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. शिवाय, टाकी बांधणाऱ्या एजन्सीला (मेहसाणाच्या जयंती सुपर कन्स्ट्रक्शन) सर्व देयके थांबवण्यात आली आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की आता विभागीय चौकशी केली जाईल. अहवालाच्या आधारे, दोषींना सोडले जाणार नाही.
गुजरात अभियांत्रिकी आणि संशोधन संस्थेतील अभियंते आणि सुरत येथील सरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांचे एक पथक तांत्रिक तपासणीसाठी घटनास्थळी पोहोचले. बांधकाम साहित्याची गुणवत्ता आणि टाकीच्या डिझाइनमधील त्रुटींचे मूल्यांकन करण्यासाठी, पथकाने ढिगाऱ्यांचे नमुने गोळा केले आणि ते प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाठवले.
ही घटना केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या संसदीय मतदारसंघाशी संबंधित आहे. जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील हे सुरतला लागून असलेल्या नवसारी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. या घटनेवरून काँग्रेसने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आणखी एक टाकी पाडावी लागली असल्याचे दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच व्हिडिओमध्ये सुरतमधील टाकीही कोसळल्याचे दिसते. काँग्रेस ज्या टाकीचा उल्लेख करत आहे ती अहमदाबादमधील सलंगपूर टाकी होती, जी बुलडोझरने पाडावी लागली होती.
या घटनेमुळे पाण्यासाठी कष्टाने कमावलेले जनतेचे २१ कोटी रुपये वाया गेले. प्रशासनाने १४ गावांची तहान भागवण्यासाठी एक मोठी पाण्याची टाकी बांधली होती. हजारो लोकांना स्वच्छ पाणी पुरवण्याचा हेतू होता, परंतु निकाल वेगळाच लागला. नव्याने बांधलेल्या टाकीची ताकद तपासण्यासाठी पाण्याने भरताच ती स्वतःच्याच वजनाने कोसळली. वर्षानुवर्षे गावकऱ्यांना पाणी देणारी ही टाकी पहिल्यांदाच पाण्याचा भारही सहन करू शकली नाही. ग्रामस्थांच्या आशा तर धुळीस मिळाल्याच, पण विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कामातील निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचारही या घटनेवरून स्पष्ट झाला आहे.




