मीरा-भाईंदर – मुंबईत मराठी-अमराठी वाद पुन्हा पेटला आहे, तर मीरा भाईंदरमध्ये, महापौर मराठी असला पाहिजे असा मराठी एकीकरण समितीने राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारला इशारा दिला आहे. मीरा भाईंदरचा महापौर मराठी की अमराठी यावरून वाद होण्याची शक्याता वाढली आहे. तर मराठी महापौर करा नाहीतर, रस्त्यावर रक्त सांडेल’, असा जाहीर इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. राज्यांतील महापालिका निवडणुकांमध्ये, मुंबई महानगर परिसरात अग्रस्थानी असलेला, मराठी-अमराठी वादाचा मुद्दा आता बाजुला पडला, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा हा वाद उपस्थित झाला आहे.
मुंबईत मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी एकीकरण समितीने हिंसाचाराची भाषा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मराठी अमराठी वादाचा मुद्दा, केंद्रस्थानी होता. मुंबईचा महापौर मराठीच होणार, हे सर्व राजकीय पक्षांना वारंवार सांगावे लागत होते. पण त्याहीपेक्षा महापौरपदाचा मुद्दा कुठे तापला ,असेल तर ते म्हणजे मीरा भाईंदरमध्ये. महापौर पदाच्या खुर्चीवर मराठी माणूस न बसवल्यास, रक्त सांडेल असा इशारा आता दिला जात आहे. मराठीच्या मुद्दयावरुन मीरा भाईंदरमध्ये हा वाद जुना आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये व निवडणुकीआधी वर्षभर मिरा भाईंदर महापालिकेत, मराठी अमराठी वादावरुन आंदोलन मोर्चे बरेच काय काय घडले आहे. तर आता निवडणुका पार पडल्या. मतदारांनी भाजपला कौल दिला आहे. पण आता मराठी व्यक्तीला महापौर नाही केले तर, मीरा भाईंदरच्या रस्त्यावर रक्त सांडेल, असा इशारा , मराठी एकीकरण समितीने दिला आहे.
एकीकडे मराठी एकीकरण समितीच्या, गोवर्धन देशमुखांनी मराठी महापौर बसवण्यासाठी रक्त सांडण्याची भाषा केलेली असताना, त्यांच्या या भूमिकेला मनसेनेही पाठिंबा दिला आहे. या इशार्यामुळे मराठी आणि अमराठी वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. मीरा भाईंदरची लोकसंख्या आपण बघितली तर, इथे गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या भागातले नेतृत्व अनेकदा अमराठी नेत्यांकडे असते.
निवडणुकीत याबाबत विचारल्यावर मराठी- अमराठी, हा इथे मुद्दाच नसल्याचे काही राजकारणी लोकानी सांगितलं होते. पण आता काही दिवसात महापौर निवडायचा आहे. त्यामुळे मराठीच चेहरा पुढे करण्यासाठी आता दबाव निर्माण झालाय. घटनेनुसार निवडून दिलेल्या प्रत्येकाला, सत्तेत सहभागी होण्याचा अधिकार आहे. पण हे सगळे करताना मराठी माणसाच्या, हक्कांचा त्यांच्या अस्तित्वाचाही, भाषेचा विचार व्हावा ही अपेक्षा प्रत्येकाला आहे. बाकी महापौर मराठी होतो की अमराठी याचे उत्तर, आपल्याला काही दिवसात मिळेलच. पण मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये ,महापौरपदाबाबत वादाची चिन्हे सध्यातरी दिसत आहेत.




