भोपाळ – भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात आधुनिक आरोग्य सेवांबद्दल मोठे दावे केले जातात. मात्र या दाव्यांची आता पोल उघड झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा गृहजिल्हा असलेल्या विदिशा या डोंगराळ प्रदेशातील एका गर्भवती महिलेला सरकारी रुग्णवाहिकाही मिळाली नाही. त्यामुळे तेव्हा परिस्थिती इतकी बिकट झाली की या महिलेला रस्त्याच्या मधोमध टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती करावी लागली.ही घटना सरकारच्या दाव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना सामुदायिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ भागातील छापारा गावात घडली. छापारा गावातील रहिवासी संजय आदिवासी यांची पत्नी संध्या हिला गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. यानंतर कुटुंबाने ताबडतोब १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. त्यांनी एकदा नाही तर अनेक वेळा फोन केला. घंटा वाजत राहिल्या, पण रूग्णवाहिलका आली नाही. वेळ निघून गेला आणि वेदना वाढत गेल्या. शेवटी, कुटुंबाला महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी पायपीट करावी लागली.
या दरम्यान वाटेत महिलेची प्रकृती बिघडली. पुढे जाणे अशक्य होते. थंडी तीव्र होती आणि रात्र खूप होती. त्यामुळे, प्रसूती रस्त्याच्या कडेला करावी लागली, ताडपत्रीचा वापर ढाल म्हणून करावा लागला. जवळच्या लोकांनी टॉर्चच्या सहाय्याने मदत केली. उघड्या आकाशाखाली, थंड वाऱ्यात, रस्ताच प्रसूती कक्ष बनला.
प्रसूतीनंतरही त्रास संपला नाही. आई आणि नवजात बाळ दोन ते तीन तास रस्त्यावर पडून राहिले. थंडीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी मर्यादित व्यवस्था करण्यात आली होती. गावकऱ्यांनी शक्य तितकी मदत केली, परंतु आरोग्य विभागाने जे काम करायला हवे होते ते सामान्य लोकांना करावे लागले. प्रसूतीनंतरही, जेव्हा कोणतेही सरकारी वाहन फक्त तीन किलोमीटर अंतरावर येण्यास तयार नव्हते, तेव्हा स्थानिक रहिवासी संजय जैन यांनी त्यांच्या खाजगी वाहनाने पहाटे साडेतीन वाजता आई आणि बाळाला रुग्णालयात घेवून गेले.
संध्याचे पती संजय आदिवासी म्हणाले कि जर रुग्णवाहिका वेळेवर आली असती, तर माझ्या पत्नीला रस्त्यात हा त्रास सहन करावा लागला नसता. मी तीन वेळा फोन केला, प्रत्येक वेळी मला १५ मिनिटे होल्डवर ठेवण्यात आले. मी पहाटे २ वाजता निघालो, पण वाटेतच तिची प्रसूती झाली. संध्या म्हणाल्या की जेव्हा तिने १०८ वर फोन केला तेव्हा तिला सांगण्यात आले की ते उशिरा येतील. जेव्हा तिने ११२ वर फोन केला तेव्हा तिला सांगण्यात आले की रुग्णवाहिका क्रमांक घ्या; आम्ही लगेच येऊ शकणार नाही.
धक्कादायक म्हणजे, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सरकारने अलीकडेच २००० रुग्णवाहिका भाड्याने घेण्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. जेव्हा गर्भवती महिलांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसेल तर या रुग्णवाहिका कुठे जातात? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.




