नवी दिल्ली – राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेवार अनेकांनी शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली होती. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी यांनी देखील गंभीर आरोप केला आहे. आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनीही गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद वाटतो. त्यामागचे रहस्य समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवार हे भाजपाला सोडून पुन्हा शरद पवारांकडे आले असते तर तो भाजपाच्या ऑपरेशन लोटसचा सर्वात मोठा पराभव ठरला असता. त्यामुळे अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? असे प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात असल्याचे संजय राऊत म्हणाले.
ते म्हणाले कि सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केले म्हणून महाराष्ट्र विमान अपघात विसरणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीत भाजपने पैसे खाल्ले, हे अजितदादांनी समोर आणले होते. त्यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे होते. ते स्वगृही येण्याच्या तयारीत होते, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला. अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने नव्हे, तर न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अजित पवार यांच्या काही आमदारांनी आणि नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्याकडे बरीच कागदपत्रे तयार झाली होती, ज्यामुळे भाजप अस्वस्थ होती. असा आरोप करत अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताचा विषय संसदेत रेकॉर्डवर आणावा असे मला वाटले, म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला. न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे.
विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)कडून चौकशी होणार नाही. विमान अपघाताच्या चौकशीसाठी कालमर्यादा घालून द्यावी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नागरी विमान वाहतूक मंत्री यांनी बोलायला हवे, असेही राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांनी एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती; पण मोदी, शाह, फडणवीस यांचा त्याला अडथळा आहे. भाजपला विरोध करणारा एक तर जीव गमावतो किंवा जेलमध्ये जातो, असा आरोपही त्यांनी केला.




