मनोरंजन विश्व् – बॉलीवूडच्या झगमगाटात अनेकदा पडद्यामागील नात्यांचे सत्य दडलेले असते. अशी अनेक प्रकरणे आहेत जी सुरुवातीला लोकांपासून लपून राहतात, पण जेव्हा ती नाती संपुष्टात येतात तेव्हा त्यातील कटू सत्य जगासमोर येते. अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील नातेही असेच एक होते. आदित्य पांचोली हा आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त कंगनासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे आणि त्यानंतर झालेल्या वादामुळेच चर्चेत राहिला. या दोघांचे नाते सुरुवातीला अतिशय गोड होते, परंतु जेव्हा त्यांच्यात दुरावा निर्माण झाला, तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या.
आदित्य पांचोलीने एका मुलाखतीत या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले होते. त्याने सांगितले की, तो आणि कंगना केवळ प्रेमीयुगुलासारखे नाही, तर चक्क पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते. त्याने दावा केला की, त्याने या नात्यासाठी खूप काही पणाला लावले होते. आदित्य म्हणाला, “मी माझ्या आयुष्यातील पाच वर्षे या नात्याला दिली. तिच्यासाठी मी माझे लग्नही धोक्यात घातले होते. आम्ही यारी रोडवर आमच्या दोघांसाठी हक्काचे घर बांधण्याची तयारी करत होतो. त्यावेळी ती जो फोन वापरत होती, तो सुद्धा माझाच होता.”
या व्यतिरिक्त, आदित्यने कठीण काळात कंगनाला केलेल्या आर्थिक मदतीचाही उल्लेख केला. जेव्हा कंगनाची बहीण रंगोलीवर ॲसिड हल्ला झाला होता, तेव्हा आदित्यने मदतीचा हात पुढे केला होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी रंगोलीच्या प्लास्टिक सर्जरीसाठी १० लाख रुपये खर्च केले होते. मी त्याचे बिल भरले होते. आज मी ते पैसे परत मागत नाही, कारण मी सर्व काही माफ केले आहे. माझी फक्त एवढीच इच्छा होती की, तिने स्वतःबद्दलचे सत्य सांगावे.”
दुसरीकडे, कंगना राणौतने या नात्याची दुसरी बाजू मांडताना आदित्यवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. तिने आदित्यला ‘वडिलांच्या वयाचा’ असल्याचे म्हटले होते. कंगनाच्या दाव्यानुसार, आदित्यने तिला मारहाण करून रक्तबंबाळ केले होते आणि तिला घरात बंदी बनवून ठेवले होते, जिथून सुटका करून घेण्यासाठी तिला पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारावी लागली होती. कंगनाने २१ वर्षांची असताना हे पाच वर्षांचे नाते संपुष्टात आणले होते. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे आणि आदित्यच्या या खळबळजनक खुलाशामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.




