सरकारी नोकरीच्या प्रलोभनातून अल्पवयीन मुलीवर ८ वर्षे सामूहिक अत्याचार; खासदाराच्या पीएचे नाव आल्याने खळबळ

SHARE:

छत्तीसगड – दुर्ग जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बांधकाम विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर तब्बल आठ वर्षे सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या भयंकर प्रकारात एकूण सहा नराधमांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्यातील तिघांना अटक केली आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणातील फरार आरोपींपैकी एकाचा संबंध थेट राजकीय नेत्यांशी असल्याचे समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणीने ३० जानेवारी २०२६ रोजी दुर्ग येथील महिला पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यावर ओढवलेला हा भयानक प्रसंग पोलिसांसमोर मांडला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, हे लैंगिक शोषण एप्रिल २०१८ पासून सुरू झाले होते आणि ऑक्टोबर २०२५ पर्यंत सातत्याने सुरू होते. हे सत्र सुरू झाले तेव्हा पीडितेचे वय अवघे १४ वर्षे होते. सार्वजनिक बांधकाम विभागात टाइमकीपर म्हणून काम करणाऱ्या कृपा शंकर कश्यप उर्फ राजू या मुख्य आरोपीने पीडितेला सुरुवातीला हेरले. त्याने तिला रोजंदारीवर नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवले आणि तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

केवळ मुख्य आरोपीनेच नव्हे, तर त्याने आपल्या इतर साथीदारांनाही या घृणास्पद कृत्यात सहभागी करून घेतले. या नराधमांनी पीडितेला विविध शासकीय विश्रामगृहावर आणि इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केला. जेव्हा जेव्हा पीडितेने या अत्याचाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या गंभीर धमक्या देण्यात आल्या. भीतीपोटी आणि आरोपींच्या दहशतीमुळे पीडिता अनेक वर्षे गप्प राहिली.

या प्रकरणात आतापर्यंत तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, मात्र बी. एन. पांडे यांच्यासह इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. विशेष म्हणजे, फरार आरोपी बी. एन. पांडे याने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर स्वतःला दुर्गचे खासदार विजय बघेल आणि दिवंगत माजी मंत्री हेमचंद्र यादव यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे नमूद केले आहे. आरोपींच्या अशा ‘हाय-प्रोफाईल’ राजकीय संबंधांमुळेच पीडितेवर दबाव होता, असा आरोप स्थानिक लोकांकडून केला जात आहे. हे आरोपी कंत्राटांमध्ये हस्तक्षेप करणे आणि बेकायदेशीर सावकारी करणे अशा गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचीही चर्चा आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा