गडचिरोली – जिल्ह्याला लागून असलेल्या आणि नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांना नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या भीषण चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मात्र, या कारवाईदरम्यान एका शूर जवानाला वीरमरण आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० मधील सदस्य आणि छत्तीसगडमधील काही नक्षलवादी अबुझमाडमधील फोदेवाडा परिसरातील जंगलात एकत्र जमले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने तातडीने या भागात नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली. जवान जंगलात पोहोचताच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही नक्षलवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मात्र, नक्षलवाद्यांशी लढताना गोळीबारात एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले. तसेच, या चकमकीत किष्टय्यापल्ली हे जवान गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहीद जवानाच्या पार्थिवाला गडचिरोली येथे शासकीय इतमामात मानवंदना देण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा दलाने शोधमोहीम आणखी तीव्र केली आहे.




