भारत विरुद्ध अमेरिका : टी२० वर्ल्ड कप २०२६ ची आज सुरूवात होणार असून पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा मुकाबला अमेरिकेशी होणार आहे. हाँ सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून, स्पर्धेची विजयी सुरूवात करण्यावर भारतीय संघाचा भर असेल.
भारत विरुद्ध अमेरिका हेड टू हेड रेकॉर्ड्स, संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून असलेल्या टी२० वर्ल्डकप २०२६ला आजपासून सुरूवात होत आहे. गतविजेत्या भारतीय संघाचा आज (७ फेब्रुवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध पहिला सामना आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. २ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर यावर्षीही तीच विजयी पताका फडकावून या स्पर्धेची दमदार सुरूवात करण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.
भारत-अमेरिका संघात हेड टू हेड रिकॉर्ड
भारत आणि अमेरिका यांच्यात आतापर्यंत फक्त एकच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे, जो २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपदरम्यान न्यूयॉर्कमध्ये झाला होता. भारताने तो सामना आरामात जिंकला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेला २० षटकांत फक्त ११० धावा करता आल्या. त्यानंतर भारताने १८.२ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाचाच वरचष्मा दिसत आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची भारताकडे संधी
टी२० वर्ल्ड कप २०२६च्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला एक मोठा विश्वविक्रम करण्याची संधी मिळेल. खरं तर, भारतीय संघाने मागील आवृत्तीत सलग आठ सामने जिंकले होते. त्यामुळे आज सुरू होणाऱ्या स्पर्धेतील या सामन्यात भारतीय संघ जिंकल्यास तो त्यांचा सलग ९वा विजय असेल. यासह, भारत टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवणारा संघ बनेल. सध्या, भारतीय संघ हा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह पहिल्या स्थानावर आहे, त्या संघांनीही प्रत्येकी सलग आठ विजय मिळवले आहेत.
दोन्ही संघांची टीम
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सैमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह, रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल (उपकर्णधार ) आणि वॉशिंगटन सुंदर.
अमेरिका चा संघ : मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंह, एंड्रीज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कमाला, संजय कृष्णमूर्ति, हरमीत सिंह, नोस्टुश केनजिगे, शैडली वान शल्कविक, सौरभ नेत्रवालकर, अली खान, मोहम्मद मोहसिन, शुभम रंजाने.




