नवी दिल्ली – भारत आणि अमेरिका दरम्यान झालेल्या व्यापार करारावर विरोधी पक्षांसह शेतकरी संघटना देखिल चिंता व्यक्त करत आहेत. त्यांचा आरोप आहे कि अमेरिकेतील सस्ता माल भारतात येईल. यामुळे देशभरातील शेतकरी देशोधडीला लागतील. या व्यापार कररावरून संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मोर्चाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की देशभरातील गावांमध्ये निदर्शने केली जातील आणि डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळे जाळतील. मोर्चाने १२ फेब्रुवारीच्या सार्वत्रिक संपालाही पाठिंबा दर्शविला.
शनिवारी पत्रकार परिषदेत, एसकेएम नेत्यांनी आरोप केला की हा व्यापार करार भारतीय शेती अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना सोपवण्यासारखा आहे. त्यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यावर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आणि त्यांचा तात्काळ राजीनामा मागितला.
एसकेएमने स्पष्ट केले की मुक्त व्यापार करारातून कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रांना वगळण्यात आल्याचा सरकारचा दावा पूर्णपणे खोटा आहे. भारत-अमेरिका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की भारताने अमेरिकन कृषी आणि अन्न उत्पादनांवर लादलेले नॉन-टॅरिफ अडथळे दूर करण्यास सहमती दर्शविली आहे, ज्यामुळे देशांतर्गत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.
अखिल भारतीय किसान सभेचे नेते कृष्णा प्रसाद म्हणाले की या करारामुळे भारतीय बाजारपेठ सुक्या पशुखाद्य, लाल ज्वारी आणि सोयाबीन तेल यासारख्या उत्पादनांसाठी खुली होईल. हा करार अमेरिका आणि युरोपीय देशांच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थांना आधार देण्यासाठी केला जात आहे, भारतीय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही. या व्यापार कराराचा कृषी क्षेत्रावर खोलवर परिणाम होईल.
बीकेयूचे शेतकरी नेते दर्शन पाल आणि राकेश टिकैत यांनीही या कराराला विरोध केला आहे. दर्शन पाल म्हणाले की आधीच कमी उत्पन्न आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांवर या कराराचा अधिक परिणाम होईल. संघटनेचे सदस्य निषेध म्हणून ट्रम्प आणि मोदी यांचे पुतळे जाळतील. त्यांनी गावांमधील वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे आणि शेतकऱ्यांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
बीकेयूचे नेते राकेश टिकैत म्हणाले की गावातील लोक या करारांचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल असा प्रश्न विचारत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना या करारांविरुद्धच्या निदर्शनांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले.
१२ फेब्रुवारी रोजी प्रस्तावित देशव्यापी सार्वत्रिक संपाला एसकेएम आणि इतर शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्या दिवशी देशभर निदर्शने केली जातील आणि अमेरिका आणि भारतीय पंतप्रधानांचे पुतळे जाळले जातील. जर भारत-अमेरिका मुक्त व्यापार करार पुढे नेला तर एक मोठे संयुक्त जनआंदोलन होईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी सरकारला दिला आहे.




