मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष सुरू आहे. १००व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ‘नवे क्षितीज’ या नावाने व्याख्यानमालेला सुरुवात झाली. आज व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस. मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरेचा सत्र पार पडत आहे.
काल भव्य दिव्य कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात सलमान खानपासून हेमा मालिनीपर्यंत दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. दरम्यान, या कार्यक्रमात सलमान खानची एन्ट्री होताच कॅमेऱ्यांची तोंडं आपसुकच त्याच्याकडे वळली. सलमान खानला पाहताच सर्वांच्या भुवया उंचावल्या. आज व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी मराठी सिनेकलाकारांनी हजेरी लावली. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर, प्रसाद ओक आणि सुनील बर्वे उपस्थित होते. ‘सलमान खानची उपस्थिती माझ्यासाठी शॉकिंग होती’, असं प्रसाद ओक म्हणाले.
प्रसाद ओकनं आजच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात हजेरी लावली. प्रसाद ओक म्हणाला, “हे दृश्य खूपच इंटरेस्टिंग वाटलं. सलमान खानचं संघाच्या कार्यक्रमात येणं, हे एकप्रकारे संघाच्या कार्याप्रति त्याने दाखवलेला सन्मान आहे, असं मला वाटतं. त्याने या कार्यक्रमात हजेरी लावली, हे मला खूप आवडलं”, असं प्रसाद ओक म्हणाले.
तर, ‘संघाचे विचार ऐकण्यासाठी सलमान खान आला ही चांगली गोष्ट आहे’, असं सुनील बर्वे म्हणाले. “तो एक चांगला माणूस आहे. त्याला चांगलं वागण्याची आणि आदर्श लोकांसमोर ठेवण्याची आवड आहे. त्याचे काही संघाविषयी किंतु परंतु असतील, त्याचे उत्तर शोधण्यासाठी तो इथे आला असावा. ही चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागतच आहे”, असं सुनील बर्वे म्हणाले.
आजच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. अभिनेता अक्षय कुमार, आणि जॅकी श्रॉफ या दिग्गज कलाकारांचीही हजेरी पाहायला मिळाली.




