पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ७३ तोळे सोने अन् लाखोंची फसवणूक; निलंबित हवालदाराला बेड्या

SHARE:

पुणे – आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांमध्ये नाव समोर आल्यानंतर फरार झालेल्या निलंबित पोलिस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशातून ताब्यात घेतले आहे. गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे.

जगताप याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, चतुःश्रृंगी आणि कोथरूड पोलिस ठाण्यांत आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि. ८) दुपारी त्याला आंध्रप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या तो पोलिस खात्यातून निलंबित आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पार्लर व्यवसायिक महिलेला घरातील आजारपण व मुलीच्या शिक्षणाचा बहाणा सांगत अडीच लाखांहून अधिक रोकड आणि सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी कोथरूड पोलिस ठाण्यात एका महिलेची ७३ तोळे सोने व १७ लाख रुपये रोख रकमेची फसवणूक केल्याचा गुन्हा जुलै महिन्यात नोंदविण्यात आला होता.

दरम्यान, २१ ऑगस्ट २०२४ रोजी जगताप याची पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली झाली होती. मात्र तो हजर न राहता फरार झाला. या काळात औंध येथील एका सराफ व्यावसायिकाकडून पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने घेतल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणानंतर त्याचे निलंबन करण्यात आले होते. फरारी काळात तो शहराबाहेर लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी तो आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील फुलपथरू गावात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथक रवाना करण्यात आले.

पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात व पोलिस अंमलदार मंगेश गायकवाड यांच्या पथकाने स्थानिक माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. तो तेथे भाड्याच्या घरात राहत होता.

यापूर्वीही जगताप याच्यावर राष्ट्रपती पदकासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप झाला होता. २०२१ मध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह दोन लिपिकांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

“गणेश जगताप याच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तो चार-पाच महिन्यांपासून फरार होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्याला आंध्रप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.”

– मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त, पुणे शहर

Leave a Comment

अधिक वाचा