मुंबई – महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिल्यानंतर शेतकरी महामार्गाच्या मोजणीला कडाडून विरोध करत आले आहेत. आता हा विरोध अधिक तीव्र झाला आहे. लातूर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यातील मोरवड येथे महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बेलखेड व आमला शिवारात मोजणीचा शेतकर्यांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखिल अनेक ठिकाणी शेतकर्यांनी महामार्गाची मोजणी बंद पाडली आहे.
शक्तिपीठ महामार्ग हा वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभी, बीड, लातूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग मार्गे गोव्यापर्यंत जाणार आहे. या महामार्गात अनेक सुपीक जमिनी जाणार आहेत. महामार्गामुळे शेती उद्ध्वस्त होईल, उदरनिर्वाह धोक्यात येईल व जीवनमानावर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे शेतकरी या महामार्गाला कडाडून विरोध करत आहे.
लातूर जिल्ह्यात या महामार्गाला शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध होत आहे, मंगळवारी लातूरच्या रेनापुर तालुक्यातील मोरवड येथे महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, यावेळी एका तरुण शेतकऱ्याने झाडावर चढत आत्महत्याचा प्रयत्न केला, यावेळी अधिकाऱ्यांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा लावण्याने शेतकरी चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सुपीक आणि बागायती जमिनीतून जाणारा हा शक्तिपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली.
सोमवारी उमरखेड तालुक्यातील बेलखेड व आमला शिवारात मोजणीसाठी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. मात्र या महामार्गामुळे शेती उद्ध्वस्त होईल, उदरनिर्वाह धोक्यात येईल व जीवनमानावर गंभीर परिणाम होईल, असा आरोप करत शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध केला. वाढता तणाव पाहता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शांतता राखून मोजणीस सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काहींना ताब्यात घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात नेण्यात आले.
उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्यासमोर झालेल्या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित होऊन अनेक कुटुंबे भूमिहीन होतील. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.




