परळी – बीड जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेत हृदयविकाराच्या झटक्याने एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरूण पुण्यात रिक्षा चालवत होता. आई-वडिल ऊसतोड मजूर आहेत. तर मृत तरूण बीड पोलीस भरतीत १६०० मीटरचा टॉपर ठरला होता. बीडमध्ये पोलिस भरती प्रक्रियेत ही घटना घडली आहे. बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील हजारो तरुण-तरुणी पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस भरतीतील शारिरिक व मैदानी चाचण्यांसाठी मैदानात उतरले आहेत.
मात्र बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी झालेला एक तरुण, १६०० मीटर धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, काही वेळातच मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना बीड मधून समोर आली आहे. मैदानावर आपल्या मेहनतीचं आणि जिद्दीचं प्रदर्शन करत असतानाच तरूणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव दीपक भास्कर वाव्हळे आहे. तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मांडखेल येथील रहिवासी होता.
दीपक पुण्यात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र पोलिस बनण्याचे स्वप्न मनात होते. तो गेल्या २ महिन्यांपासून बीड जिल्ह्यात आपल्या गावी येऊन नियमित पोलिस भरतीचा सराव करत होता. दीपकने मेहनतीच्या जोरावर १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली होती. या स्पर्धेत तो प्रथम क्रमांकावर आला होता. मात्र विजयाचा क्षण साजरा करण्याआधीच काही वेळातच हृदयविकाराचा तीव्र झटका बसून त्याचा मृत्यू झाला आहे. धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर काही वेळातच दीपकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित असलेल्या तरूणांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला होता. त्या मृत मूलाचे आई-वडिल ऊसतोड मजूर आहेत. दीपक हा त्याच्या कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्याचे वडील ऊसतोडणी ट्रॅक्टरवर मजूर म्हणून काम करतात, तर आई शेतमजुरी करून कुटुंब चालवते. दीपकचा हा पोलीस भरतीचा पहिलाच प्रयत्न होता. मात्र दुर्दैवाने त्याचं पोलिस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. एकुलत्या एक लेकाच्या अकाली मृत्यूने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परळीतील मांडखेल गावाच्या परिसरात स्थानिक नागरिकांकडून या पोलिस भरतीतील तरूणाच्या मृत्यूचे दुःख व्यक्त करण्यात आले आहे.




