नागपूरमध्ये १२ वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीचा अपघातात मृत्यू; वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ

SHARE:

नागपूर – राज्यात सगळीकडे १२  वी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. आता नागपूरमध्ये १२ वीच्या विद्यार्थीनीसह तिच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. नागपूर शहराच्या मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या विद्यार्थिनीसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घटना घडली.

१२ वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तन्वी भिवणकर हिचा एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या अपघाताच जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारे तिचे वडील सुभाष भिवणकर यांचाही घटनास्थळी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तन्वी आणि तिचे वडिल दुचाकीवरुन जात असताना विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली आहे. या अपघातात वडिल आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वंशिका नरुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे, तिच्यावर नागपूरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूरमधील अपघाताच्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून बेदम मारहाण केली आहे. तसेच, ट्रकच्या केबिनला आग लावून घटनास्थळी दगडफेकही करण्यात आली आहे. या दगडफेकीत पोलीस वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, ट्रकचालक प्रफुल भोयरला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूरमधील उमरेड पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा