मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील लेखात म्हटले आहे की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाची धुरा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करणार होतो. या दाव्यामुळे राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी याबाबत अनेक दावे केले होते. यासाठी बैठकाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकात मोठा दावा केला आहे.
विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाची धुरा अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल ,असंही शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकामध्ये म्हटले आहे.
अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटेनाटे षडंयत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला. पण झालेली चूक आता दुरुस्त करायची या विचाराने दादा गेल्या चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असा निर्धार करुन ते जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करत होते. त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादीची युती घडवून आणली होती. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व धुरा अजितदादांकडे सोपवण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी केला होता, असे शशिकांत शिंदे यांनी लेखात म्हटले आहे.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर खुद्द शरद पवार यांनीच 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय पारा तापला होता. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला होता. मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला होता.
यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल- सुनील तटकरे गटाकडून रोहित पवारांना खुले आव्हान देण्यात आले. त्यावर रोहित पवारांनी दादांच्या निधनामुळे आम्ही सध्या संयम बाळगतो आहोत, असे म्हणत आक्रमक भूमिका टाळल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शशिकांत शिंदे यांच्या दाव्यावर अजित पवार गटातील नेते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




