मुंबई – गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. यावरून विरोधी पक्षासह अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. या अपघातानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत, आणि या अपघातासाठी विमान ज्या कंपनीचं विमान होतं, त्या कंपनीला जबाबदार धरले आहे. अशी जिवघेणी सेवा देणाऱ्या कंपनीवर सरकार कारवाई का करत नाही, असा थेट सवाल रोहित पवार यांनी केंद्र सरकारला केला आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेवरून राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी म्हटले आहे की निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाते, निकृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारले जाते, पण जीवघेण्या सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांवर कोणतीही कारवाई करू नये? आतापर्यंत व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करून कंपनीला टाळं लावायला पाहिजे होतं.पण असे होताना दिसत नाही, कंपनीचे मालक आणि भागीदार इतके वजनदार आहेत की सरकार त्यांच्यावर कारवाई करण्यास घाबरत आहे, हे समजण्यासारखे नाही का? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
देशातील अनेक महत्त्वाचे लोक, सेलिब्रिटी, सर्व पक्षांचे राजकीय नेते व्हीएसआर कंपनीची सेवा घेतात. परंतु त्यांचे जीवन आणि त्यांचे पायलट आणि इतर कर्मचारी महत्त्वाचे नाहीत? जर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून ही कंपनी सेवा देत असेल, तर ती सर्वांसाठीच धोकादायक आहे. त्यामुळे अशा जिवघेण्या सेवा देणार्या विमान कंपनीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी, आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी अहमदाबाद विमान अपघाताचा दाखला देत बारामतीच्या अपघातावर भाष्य केले. रोहित पवारांनी लिहिले आहे की, अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील
यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का? याचा कसून, सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
माहित असावे कि रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी विमानाच्या कंपनीबाबत संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले कि हे विमान १६ वर्षांपूर्वीचं होतं. २५ आणि २६ जानेवारी रोजी या विमानाने मुंबई ते सुरत आणि सुरत ते मुंबई असा प्रवास केला होता. विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेन्टेन होतं असं सांगितलं. अपघात दृश्यमानतेमुळे झाल्याचं कंपनीच्या मालकांकडून सांगण्यात आलंय. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये आकाशातच विमान तिरकं झालं आणि संतुलन बिघडल्यामुळे कोसळल्याचं दिसत आहे.
अजित पवाराचा अपघात झालेल्या विमानाच्या कंपनीवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. याबाबत रोहित पवार यांनी सांगितलं कि यापूर्वी २०२३ मध्ये व्हीएसआर कंपनीच्या लिअरजेट विमानाचा अपघात झाला होता. यात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते. आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आला नाही. हा रिपोर्ट दाबण्यात आला.
मात्र अजित दादांच्या अपघातानंतर डीजीसीएने रिपोर्ट सादर करणार असल्याचं सांगितलं. मग आधीचा रिपोर्ट दाबण्यात का आला, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला होता. हा रिपोर्ट आला असता आणि सरकारपर्यंत पोहोचला असता तर वेळीत कंपनीवर कारवाई करण्यात आली असती. तो रिपोर्ट आला असता तर अजित दादा जिवंत असते, अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली. युरोपच्या कंपनीने व्हिएसआर कंपनीवर बंदी आणली, मात्र भारतात यावर कारवाई करण्यात आली नाही, असं रोहित पवार म्हणाले होते.




