नवी दिल्ली – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर आश्रमातील मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप दुसरे तिसरे कोणीही केला नाही तर रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी यांनी केला आहे. या प्रकरणी आशुतोष ब्रह्मचारी यांनी प्रयागराजमधील विशेष पॉक्सो न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या आरोपाने देशभरात आणि शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या भक्तांमध्ये खळबळ माजली आहे.
प्रयागराजमधील विशेष पॉक्सो न्यायालयात रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी यांनी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. याचिकेत दावा करण्यात आला आहे की माघ मेळ्यादरम्यान शंकराचार्यांच्या छावणीत दोन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी प्रयागराजच्या विशेष पोक्सो न्यायालयात शुक्रवारी पार पडली. न्यायाधीश विनोद कुमार चौरसिया यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. यानंतर शंकराचार्यांवर गुन्हा दाखल करायचा की खटला रद्द करायचा हे ठरवले जाईल.
शुक्रवारी दुपारी २ वाजता सुनावणी सुरू झाली तेव्हा तक्रारदार आणि त्यांचे स्वतःचे वकील आशुतोष महाराज यांनी न्यायालयाला सांगितले कि दोन शिष्यांनी मला त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले आहे, जे हृदयद्रावक आहे. गुरुकुलाच्या नावाखाली मुलांवर अत्याचार केले जात आहेत. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन न्यायाधीशांनी पोक्सो कोर्टरूम रिकामा करण्याचे आदेश दिले. बंद खोलीत आणि कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली, पीडित मुलांनी त्यांच्यावरील अत्याचाराची संपूर्ण कहाणी न्यायाधीशांना सांगितली.
आशुतोष महाराजांच्या म्हणण्यानुसार, आश्रमात त्यांच्यासोबत जे घडत आहे तीच खरी गुरुसेवा आहे असे सांगून त्यांना कसे फसवले गेले हे मुलांनी न्यायालयाला सांगितले.
सुनावणीदरम्यान, आशुतोष महाराजांनी सांगितले की त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांनी न्यायालयात अनेक सीडी सादर केल्या, ज्या त्यांनी सार्वजनिक करण्यास नकार दिला. ते म्हणतात की हे पुरावे इतके मजबूत आहेत की सत्य उघड होईल. न्यायाधीशांनी त्यांना पीडितांबद्दल काय वाटते असे विचारले तेव्हा त्यांनी गुरु परंपरेचा उल्लेख केला आणि सांगितले की न्याय न मिळाल्याने मुलांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि आता ते त्यांचे पालक आहेत.
आशुतोष महाराज यांच्यासोबत चेहरे झाकलेली अल्पवयीन मुले होती. त्यांनी माध्यमांना सांगितले की मुलांनी सत्य सांगितले आहे. आता निर्णय न्यायपालिकेच्या हातात आहे. या मुलांना येथे धोका आहे म्हणून त्यांना प्रयागराजला सोडावे लागेल. दुसरीकडे, शंकराचार्य यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती केली आहे. आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.
मौनी अमावस्येच्या सहा दिवसांनंतर २४ जानेवारी रोजी, आशुतोष महाराजांनी प्रयागराज पोलिस आयुक्तांकडे अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यात असा आरोप करण्यात आला की अल्पवयीन मुलांना अविमुक्तेश्वरानंद यांच्या छावण्या आणि गुरुकुलांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना वैयक्तिक सेवा, गर्दी जमवणे, कार्यक्रम आयोजित करणे आणि पालखी वाहून नेणे अशी कामे करायला लावली जात होती. मुलांचे लैंगिक शोषण होण्याची शक्यता देखील आहे. आशुतोष महाराजांनी पोलिस प्रशासनाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने आशुतोष महाराजांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्यांनी ८ फेब्रुवारी रोजी न्यायालयात याचिका दाखल केली.




