मंत्री नरहरी झिरवळ गोत्यात तर एनसीपी बॅकफुटवर, सुनेत्रा पवारांनी सोमवारी बोलवली तातडीची बैठक

SHARE:

मुंबई – राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून मंत्री नरहरी झिरवाळ गोत्यात सापडले आहेत. तसेच या घटनेने अजित पवार गट कोंडीत सापडला असून पक्षाला यातून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी ३५ हजार रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचून राजेंद्र ढेरंग यांना पैसे स्वीकारताना ताब्यात घेतले. झिरवाळांच्या खासगी पीएनं पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पुढे आली आहे.

या घटनेवर नरहरी झिरवाळ म्हणाले होते कि संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तत्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन. मात्र नंतर ते नॉट रिचेबल झाले.

या कारवाईमुळे मंत्री नरहरी झिरवळ आणि अजित पवार गटाची प्रतिमा मलिन झाली. लाचखोरीच्या या प्रकरणामुळे नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून अजित पवार यांच्या माघारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच बॅकफुटवर आला आहे. त्यामुळे आता या अडचणीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. नरहरी झिरवळ प्रकरणात नेमक काय झालं, याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य समजून घेणार आहेत. जेणेकरुन या प्रकरणात पुढे काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल.

या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत सापडले आहेत. या घटनेमुळे त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा रंगली असून आता सोमवारी होणार्या एनसीपी अजित पवार गटाच्या कोर कमेटीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Leave a Comment

अधिक वाचा