नाशिक – ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर चोरी झाली नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्या नाशिक जिल्ह्यातील ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर लुटी आणि अपहरण प्रकरणात आता मोठा खूलासा झाला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ७ ही संशयितांची इगतपुरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील फिर्यादी संदीप पाटील यांची तक्रार बनावट असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट झाले आहे.
फिर्यादी संदीप पाटील यांनी कर्नाटक राज्यातील चोरला घाट परिसरात २ हजार रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला, तब्बल ४०० कोटी रुपयांचा कंटेनर चोरीला गेल्याचा दावा केला होता. या लुटीच्या प्रकरणात मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने व त्याच्या साथीदारांनी आपले अपहरण केल्याचा आरोप करत, त्यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते.
या पथकाने लोकेशन डेटा, कॉल डिटेल्स रेकॉर्ड प्रवासमार्ग, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनाक्रमाचा सखोल अभ्यास केला. तपासात फिर्यादीने सांगितलेल्या घटनाक्रमात आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्या आहेत. कोणतीही कंटेनर लूट घडलीच नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुंबई, गुजरात आणि कल्याण येथून किशोर सावला यांच्यासह विराट गांधी, जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, मच्छिंद्र मढवी आणि जनार्दन धायगुडे अशा ७ जणांना अटक केली होती.
मात्र, न्यायालयात सरकारी पक्षाला आरोपींविरोधात ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. सर्व बाजू तपासल्यानंतर न्यायालयाने ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. न्यायालयीन निकालानंतर मुक्त झालेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खोटी तक्रार दाखल होण्यामागे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या संदीप पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.




