नवी दिल्ली – एकीकडे देशातील जनता गरीबीच्या खाईत लोटली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे जनतेच्या कराचा पैसा पाण्यासारखा भाजप सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विदेशी दौर्यांसाठी विमान प्रवासावर खर्च करत आहे. २०१५ ते २०२५ दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारी तिजोरीतून ७६२ कोटी रुपये खर्च झाले, केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे.
शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने प्रधानमंत्रीच्या परदेश दौऱ्यांवरील खर्च आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळांबद्दलची इतर माहिती एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. या माहितीनुसार २०२४ मध्ये पीएम मोदींच्या परदेश दौऱ्यांवरील वार्षिक खर्च १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, तर २०२५ मध्ये मोदींनी युरोपीय राष्ट्रे, अमेरिका, आफ्रिका आणि पूर्व आशियाच्या केलेल्या दौर्यांवर १७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला.
प्रधानमंत्री मोदींच्या परदेश दौऱ्यांवर सन २०१५ मध्ये ९१.५ कोटी रूपये खर्च आला. २०१६ मध्ये ३३.२२ कोटी खर्च आला. २०१७ मध्ये ४४.२७ कोटी, २०१८ मध्ये ५१.४६ कोटी, २०१९ मध्ये ७१.७६ कोटी, २०२० कोणताही दौरा झाला नाही. यानंतर २०२१ मध्ये ३६.११ कोटी, २०२२ मध्ये ५५.८२ कोटी, २०२३ मध्ये ९३.६३ कोटी, २०२४ मध्ये १०९.५१ कोटी आणि २०२५ मध्ये १७५.१९ कोटी रूपये खर्च आला.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, यात्रेदरम्यान बहुतेक आतिथ्य खर्च यजमान देश उचलतो, तर सरकार बहुतेक सुरक्षा व्यवस्था, अधिकृत शिष्टमंडळे, मीडिया दल आणि इतर रसद यावर खर्च करते. मे २०१४ पासून, प्रधानमंत्रीच्या शिष्टमंडळाचा आकार आवश्यकतांनुसार २७ ते ७२ दरम्यान होता, २०२५ मध्ये पाच देशांना भेट देणाऱ्या एका दौऱ्यात ९५ सदस्य होते, असे मंत्रालयाच्या उत्तरात म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिसादातून असेही दिसून आले आहे की मनमोहन सिंग सरकारने या दौऱ्यांपेक्षा खूपच कमी खर्च केला. २०११ मध्ये अमेरिकेसाठी १०.७४ कोटी रुपये, २०१३ मध्ये रशियासाठी ९.९५ कोटी रुपये, २०११ मध्ये फ्रान्ससाठी ८.३३ कोटी रुपये आणि २०१२ मध्ये जर्मनीसाठी ६.०२ कोटी रुपये. परंतु खर्चात वाढ महागाई, चलनातील चढउतार आणि कव्हर केलेल्या देशांची संख्या, प्रवासाचे अंतर, सुरक्षा आवश्यकता आणि प्रतिनिधी मंडळाचा आकार यासारख्या घटकांमुळे झाली.




