आरोग्य : कॅन्सर एखाद्या एका मोठ्या गोष्टीमुळे होत नाही, तर तो अनेक वर्षांच्या सवयींमुळे आकार घेतो. म्हणूनच छोट्या पण सातत्यपूर्ण योग्य निवडी भविष्यात मोठा फरक घडवू शकतात.
कॅन्सर म्हटले की डोळ्यासमोर सिगारेट, तंबाखू आणि दारू यांसारखे मोठे धोके उभे राहतात. पण तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचा धोका केवळ या सवयींपुरता मर्यादित नाही. रोजच्या आयुष्यात आपण सहज दुर्लक्षित करणाऱ्या काही छोट्या सवयीही वर्षानुवर्षे एकत्र येऊन मोठा परिणाम करू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, कॅन्सर हा अचानक होत नाही. रोजच्या छोट्या ‘मायक्रो-एक्सपोजर’मुळे तो हळूहळू तयार होतो. प्रदूषण, सनस्क्रीन न लावणे, अपुरी झोप, जास्त प्रोसेस्ड फूड… या गोष्टी त्या क्षणी धोकादायक वाटत नाहीत, पण दीर्घकाळासाठी या गोष्टी गंभीर ठरू शकतात.
‘मायक्रो-एक्सपोजर’ म्हणजे काय?
१. वायू प्रदूषणाचा हळूहळू परिणाम
वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ आणि इंधन जळल्याने तयार होणारे PM2.5 कण फुफ्फुसांच्या आतपर्यंत पोहोचतात. दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास, अगदी धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. एक दिवसात परिणाम जाणवत नाही, पण वर्षानुवर्षे तो साचत जातो.
२. रोजची हलकी उन्हातली तिरीपही धोकादायक
समुद्रकिनारी तीव्र उन्हामुळे सनबर्न झाला तर आपण सावध होतो, पण रोज ऑफिसला ये-जा करताना, दुचाकी चालवताना किंवा मैदानी व्यायाम करताना मिळणाऱ्या सौम्य UV किरणांकडे दुर्लक्ष होते. सततचा हलका UV संपर्क त्वचेच्या पेशींमध्ये DNA बदल घडवू शकतो, ज्यामुळे पुढे त्वचारोग किंवा कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
३. प्रोसेस्ड फूड, जास्त साखर आणि लठ्ठपणा
प्रोसेस्ड मांस, जास्त साखर आणि नियमित दारू सेवन शरीरात सूज (Inflammation), इन्सुलिन रेसिस्टन्स आणि हार्मोनल बदल निर्माण करतात. असे वातावरण असामान्य पेशींना वाढण्याची संधी देऊ शकते. हे परिणाम त्वरित दिसत नाहीत; पण दीर्घकाळात धोका वाढतो.
४. अपुरी झोप आणि बिघडलेलं जैविक घड्याळ
नाईट शिफ्ट, कमी झोप आणि अनियमित दिनचर्या मेलाटोनिन व मेटाबॉलिझमवर परिणाम करतात. काही संशोधनानुसार, दीर्घकाळ अशा पद्धतीने राहिल्यास विशिष्ट कॅन्सरचा धोका वाढण्याशी संबंध आढळतो.
५. सतत बसून काम करण्याची सवय
तासन्तास बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि व्यायाम टाळणे यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळात हेही जोखीम वाढवणारे ठरू शकते.
मग बचाव कसा करायचा?
या सगळ्या गोष्टी असल्या तरी घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त जागरूक राहण्याची गरज आहे. आपल्या शरीरात DNA दुरुस्ती आणि मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली असते. मात्र छोटे-छोटे धोके साचत गेले तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
दररोजच्या छोट्या सवयींमध्ये करा हे बदल
नियमित सनस्क्रीनचा वापर
- घरात आणि कार्यालयात चांगले व्हेंटिलेशन
- प्रोसेस्ड फूड आणि साखर कमी करणे
- दारूचे सेवन मर्यादित ठेवणे
- दररोज ७–८ तासांची झोप
- किमान ३० मिनिटे शारीरिक हालचाल.
कॅन्सर एखाद्या एका मोठ्या गोष्टीमुळे होत नाही, तर तो अनेक वर्षांच्या सवयींमुळे आकार घेतो. म्हणूनच छोट्या पण सातत्यपूर्ण योग्य निवडी भविष्यात मोठा फरक घडवू शकतात.




