व्यवसाय : आयटी क्षेत्राच्या भविष्याला एआयमुळे निर्माण झालेल्या धोक्यामुळे भारतीय शेअर बाजारात लक्षणीय घसरण झाली असून इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असली तरी, गुंतवणूकदार आता सोने-चांदीच्या ईटीएफकडे वळले आहेत. १३ फेब्रुवारीपर्यंत म्युच्युअल फंडांच्या आयटी होल्डिंग्जचे मूल्य ३.५६ लाख कोटींवरून ३.०४ लाख कोटींवर घसरले आहे.
२०२६ वर्ष भारतीय शेअर बाजारातील आयटी स्टॉक्ससाठी निराशाजनक ठरला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आयटी स्टॉक्सवर दबाव वाढला असून आयटी शेअर्समध्ये फेब्रुवारी महिन्यातील लक्षणीय घसरणीमुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये टेन्शन वाढले आहे.
वेगाने विकसित होणाऱ्या जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मुळे भारतीय सॉफ्टवेअर निर्यात कंपन्यांसाठी उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत कोडिंग आणि आयटी सपोर्ट सेवांची मागणी कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. या संभाव्यतेमुळे आयटी शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा लागला, ज्यामुळे म्युच्युअल फंडांना मोठे नुकसान झाले आहे.
एआयचा म्युच्युअल फंडांना गळती
दिवसेंदिवस प्रगत होणाऱ्या जनरेटिव्ह एआय आणि अँथ्रोपिक यासारख्या स्टार्टअप्सनी सादर केलेल्या नवीन ऑटोमेशन टूल्समुळे भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांच्या पारंपारिक व्यवसाय मॉडेल्सबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. आयटी क्षेत्रातील या ‘स्ट्रक्चरल शिफ्ट’च्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली, ज्याचा थेट परिणाम म्युच्युअल फंड पोर्टफोलिओवर झाला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात निफ्टी आयटी निर्देशांक जवळपास १४% आपटला असून म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमधील टॉप-१० आयटी स्टॉक्सचे मूल्य अंदाजे ५०,००० कोटींनी कमी झाल्याचा अंदाज आहे. आयटी स्टॉक्सवरील अलीकडची घसरण केवळ विक्री नाही तर आयटी क्षेत्राच्या भविष्याबद्दल नवीन दृष्टिकोनाचे लक्षण असल्याचे तज्ञांचे मत आहे.
आयटी स्टॉक्सच्या घसरणीचा म्युच्युअल फंडांवर परिणाम
आयटी क्षेत्रातील या त्सुनामीमुळे टेक क्षेत्रातील म्युच्युअल फंडांच्या एनएव्हीवर प्रचंड दबाव आला आहे:
घटता परतावा: गेल्या आठवड्यात टेक फंडांचा परतावा सरासरी ६% आणि गेल्या महिन्यात १२% घसरला आहे.
मोठ्या कंपन्या: इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये दुहेरी अंकी पडझड झाली.
विक्रीचा जोर: म्युच्युअल फंडांनी फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत अंदाजे ४१०० कोटी किमतीचे शेअर्स विकले आहेत, जे तीन वर्षांतील पहिली मोठी विक्री आहे.
अशा परिस्थितीत, सध्याच्या अनिश्चिततेत, ‘डिप बाय’ची रणनीती धोकादायक असू शकते असे तज्ञांचे मत आहे. त्याचवेळी, तुम्ही दीर्घकाळासाठी एसआयपी करत असाल तर शिस्त पाळा, पण तुमची गुंतवणूक फक्त एकाच क्षेत्रात मर्यादित ठेवू नका.




