मनोरंजन विश्व : सध्या हिंदी वेबविश्वात आणि मराठी रंगभूमीवर एका अभिनेत्रीची हवा आहे, ती म्हणजे अमृता खानविलकर. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘तस्करी’ आणि सध्या रंगभूमीवर तुफान प्रतिसाद मिळत असलेल्या ‘लग्नपंचमी’ या नाटकातील तिच्या कामाचं कौतुक होतंय. ‘एखाद्याच्या कारकिर्दीतला सुवर्णकाळ सुरू असो वा ‘काहीच घडत नाहीय’ असा टप्पा सुरू असो, कलाकारानं कधीच थांबता कामा नये’, असं ती स्पष्टपणे बोलते.
‘तस्करी’ या वेब सीरिजचं आणि त्यातील तुझ्या कामाचं जगभरातून कौतुक होतंय, तुझा अनुभव कसा होता ?
आधी सीरिजमधील वेगळ्या व्यक्तिरेखेसाठी मला विचारणा झाली होती, मात्र नीरज पांडे यांनी मला विचारलं, ‘तुला अॅक्शन करता येईल का?’ तर मी म्हटलं, ‘तुम्ही सांगाल ते करेन’. मग मी पुण्यात एकाकडे रीतसर प्रशिक्षण घेतलं. त्याचा व्हिडीओ चित्रीत करून पाठवला आणि मला मिताली कामतची भूमिका मिळाली. नीरज पांडे यांचा कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो, तो कलाकारामध्ये उतरला की, त्यांच्यासोबत काम करायला मजा येते.
मराठी कलाकारांना आजही हिंदीत जाणं कठीण आहे की, आता तो मार्ग सोपा झाला आहे ?
आता सोपं झालं आहे. सतत लोकांना भेटत राहिलं पाहिजे, तर लोक आपल्याला विचारतील. त्यांच्यासाठी तुम्ही ‘मराठी कलाकार’ नसता ते तुमच्याकडे फक्त ‘कलाकार’ म्हणून पाहत असतात. करिअरच्या कोणत्याही टप्प्यावर मेहनत घेत राहिली पाहिजे, तरच तुमच्याकडे मोठमोठ्या भूमिका येत राहतील. एखाद्याच्या कारकिर्दीतला सुवर्णकाळ सुरू असो वा ‘काहीच घडत नाहीय’ असा टप्पा सुरू असो, कलाकारानं कधीच थांबता कामा नये.
सिनेमातील प्रस्थापित अभिनेत्रींनं नाटक करण्याचा निर्णय घेणं, ही जोखीम पत्करल्यासारखं वाटलं नाही?
मला कधी ना कधी एक तरी नाटक करायचं होतं. फक्त योग्य संधीची वाट पाहत होते. ‘लग्नपंचमी’ या माझ्या पहिल्यावहिल्या नाटकात मी फक्त काम करत नाहीय; तर त्याची निर्मातीदेखील आहे. यामुळे एक नवा आयाम मिळाला, एक नवा पैलू कळला. ‘आपण एकत्र मिळून हे नाटक उभं करू या’ हा निर्माती-लेखिका मधुगंधा कुलकर्णीचा विचार मला मनोमन पटला आणि नाटक प्रेक्षकांसमोर आलं. आता तर प्रत्येक प्रयोगाला तुफान प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे नाटक करण्याचा घेतलेला निर्णय सार्थकी लागल्याचं समाधान मिळतंय.
आता या टप्प्यावर नकार मिळतो का? तो स्वीकारण्याचे तुझे फंडे काय आहेत ?
कोणत्याही टप्प्यावर नकार मिळायलाच हवा. त्याशिवाय माझ्यात कलाकार म्हणून काय कमी आहे हे कळणार तरी कसं? या मुद्द्याबाबत नवोदित कलाकारांना सांगावंसं वाटतं की, तुम्हाला नकार मिळतो तो तुमच्यातल्या टॅलेंटला नसतो. अमुक व्यक्तिरेखेच्या चौकटीत तुम्ही बसत नसता म्हणून तुम्ही नाकारले जाता. त्यानंतर तुम्ही स्वतःला कसे घडवता हे महत्त्वाचं असतं.
‘चंद्रमुखी’ सिनेमामुळे तू यश पाहिलंस, त्यानंतरचा काळ कसा होता? नायिकाप्रधान कलाकृतींसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा झाल्या, की चित्र पूर्णपणे वेगळं होतं?
‘चंद्रमुखी’ नंतर दोन वर्ष मी एकटी पडले होते. एवढा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर माझ्याकडे विविध प्रोजेक्टसची रांग लागली असेल, असं वाटणं स्वाभाविक होतं, पण मला कोणत्या प्रकारच्या भूमिकेबद्दल विचारावं हेच सिनेसृष्टीतल्या लोकांना कळत नव्हतं, त्यामुळे ती दोन वर्ष कोणताही प्रोजेक्ट हातात नव्हता. त्या काळात मराठी सिनेसृष्टीतून काहीच विचारणा झाली नाही. मग अशा परिस्थितीत निर्मितीची सूत्र हातात घेऊन उतरावं लागतं. आता नेहा पेंडसे हिचंच उदाहरण आहे. ‘तिघी’ नावाच्या सिनेमाची तीच निर्माती आहे आणि ती त्यात काम करत आहे. मराठी सिनेसृष्टीतून म्हणावं तसं काम येतच नाहीय.
तू कमाल नाचतेस, पण तुझ्या या वैशिष्ट्याला कमी वाव मिळाला आहे, असं वाटतं का ?
असं अजिबात नाही. उलट मी याबाबत नशीबवान आहे. आजही माझी सगळी गाणी त्याच उत्साहानं वाजवली जातात आणि त्यावर लोक थिरकतातही. आजवर माझ्या दिग्दर्शकांनी, माझ्या गाण्यांनी माझ्या नृत्य कौशल्याला पुरेपूर वाव दिला आहे.
कोणती भूमिका साकारायची तीव्र इच्छा आहे आणि का?
ललिता बाबर यांचं जीवन पडद्यावर दाखवायचं आहे. त्याच्यावर कामही सुरू आहे. पण सध्या मराठी सिनेमाचं गणित वर-खाली होतंय. अशात कोणाच्या तरी आयुष्यावर सिनेमा करतोय; तर तो ‘चोख’च झाला पाहिजे, या मताची मी असल्यामुळे त्यावर काम सुरू आहे. तसंच संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचं माझं स्वप्न आहे.
दोन सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मैत्री असू शकते, यावर तुझा विश्वास आहे का ?
माझी सगळ्या जणींसोबत मैत्री आहे. मी कोणावरही डुख धरू शकत नाही. जे काही आहे ते तोंडावर बोलून मोकळी होते. त्यासह मी ‘सॉरी’ बोलायलाही सगळ्यात पुढे असते. समोरासमोर आलो की, ते क्षण साजरे करतो आणि आपापल्या कामाकडे वळतो. प्रत्येक टप्प्यावर ‘मैत्री’ बदलत राहते, हे झालंच पाहिजे, नवे लोक आयुष्यात यायला हवे आणि जुन्यांना धरून राहिलं पाहिजे.
आताच्या टप्प्यावर माझी स्वतःशीच स्पर्धा आहे. नव्या कलाकारांची फळी उदयाला येतेय, तर आता या टप्प्यावर जम बसवण्यासाठी माझी धावपळ सुरू आहे. त्यासाठी जोखीम पत्करून वेगवेगळं काम करण्याचा सतत प्रयत्न करत आहे.




