उत्तर प्रदेश – महोबा जिल्हयात भ्रष्टाचाराची पोल उघड करणारा एक प्रकार समोर आला आहे. चरखारी परिसरात बांधलेली पाण्याची टाकी चाचणी दरम्यान फुटली आणि टाकीमधून पाणी वाहू लागले. या घटनेचा एक व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारामुळे आणि घोर निष्काळजीपणामुळे ही समस्या निर्माण झाली. टाकीच्या बांधकामादरम्यान, कंत्राटदाराने वाळूमध्ये माती मिसळली आणि निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले असे वृत्त आहे.
महोबा जिल्हयातील चरखारी विधानसभा क्षेत्रातील नागरडांग या गावात गेल्या वर्षभरापासून एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी चाचणीसाठी टाकीत पाणी भरण्यात आले. परंतु अर्धे पाणी भरताच टाकी फुटली आणि टाकीतून पाणी वेगाने वाहू लागले. ६५ लाख रूपये खर्च करून ही टाकी बांधण्यात आली होती.
या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर, अधिकारी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तर गावप्रमुख गायत्री यांनी अधिकाऱ्यांना बांधकामातील अनियमिततेची तक्रार करणारे पत्र पाठवून दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महोबा जिल्ह्यात अंदाजे ९०० कोटी खर्चाचे जल जीवन अभियान सुरू आहे. हा प्रकल्प २०२४ मध्ये पूर्ण होणार होता, परंतु आता त्याची अंतिम मुदत २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत, परंतु पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. शिवाय, पाईपलाईन टाकताना खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत, तर अधिकारी सर्व काही ठीक असल्याचा दावा करतात.
३० जानेवारी रोजी, आमदार ब्रिजभूषण राजपूत यांनी सहाय्यक गावप्रमुखांसह मंत्री स्वतंत्रदेव यांना थांबवले आणि प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या मते, त्यांच्या क्षेत्रातील ४० गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आल्या, परंतु गळती आणि खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत.
जैतपूर विकास गटातील नगरदंग ग्रामपंचायतीच्या गावप्रमुख गायत्री यांनी सांगितले की या प्रकल्पावर अंदाजे २६१.५१ लाख खर्च करण्यात आला आहे. ९५ गावांमध्ये ९०० किमी पाईपलाईन टाकण्यात आल्या आणि ३२ हजार कुटुंबांना जोडणी देण्याचे लक्ष्य होते.
२०२५ मध्ये त्यांच्या गावात एक टाकी बांधण्यात आली होती. १३ फेबु्रवारी रोजी ती पाण्याने भरली गेली. तथापि, दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी भेगा पडल्या आणि पाणी गळू लागले. त्यांनी जिल्हा दंडाधिकारी गझल भारद्वाज यांना टाकी फुटल्याची माहिती दिली आणि सरकारी निधीचा गैरवापर आणि बांधकामात मनमानी केल्याचा आरोप केला.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की कंत्राटदार आणि काही सरकारी अधिकारी याद्वारे सार्वजनिक निधीचा अपहार करण्यासाठी संगनमत करत आहेत. लोक सोशल मीडियावर लिहित आहेत की अशा प्रकल्पांवर मोठा खर्च करूनही, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जनतेला फायदा होण्याऐवजी नुकसान होत आहे.
या घटनेवरून सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाना साधल आहे. अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, महोबातील पाण्याची टाकी भाजपच्या भ्रष्टाचाराचा भार सहन करू शकली नाही. त्यांनी म्हटले की,महोबापासून लखनौपर्यंतच्या भ्रष्टाचाराच्या पाईपलाईनमधून पाण्याऐवजी पैसे मिळत असल्याने येथे बुलडोझर चालणार नाहीत. त्यांनी पुढे लिहिले की हे जल जीवन अभियान नाही तर कमिशन अभियान आहे.




