मुंबई – अजित पवारांच्या विमान अपघातावरून विरोधी पक्षासह अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. या अपघातावर अजित पवार गटाचे आमदार अमोर मिटकरी यांच्यासह शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने या अपघाताविषयी संशय व्यक्त करत आहेत. हा अपघात नसून १०० टक्के घातपात असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील विमान अपघातावर शंका व्यक्त केली असून त्यांनी या अपघाताची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. अपघाताच्या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्याशी तत्काळ पत्रव्यहार केला जाईल आणि त्यांना सीबीआय तपासासंदर्भात विनंती केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला सांगितले.
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी अपघाताचा तपास संथगती होत असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच विमानाचे संचालक असलेल्या दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सकडून निष्काळजीपणा आणि नियामक अपयशाचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी ऑपरेशनल आणि क्रू अनियमिततेबद्दल चिंता व्यक्त करत पुराव्याची छेडछाड केली जाऊ शकते, असाही संशय रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.
अपघाताला २० दिवस उलटून गेले आहेत तरीही तपासाला गती मिळालेली नाहीये. हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी एक्सवर पोस्टकरून म्हटलंय. दरम्यान तपासातील विलंब हा व्हीएसआर कंपनीला पुरावे नष्ट करण्याचा संधी देण्यासाठी केला जात आहे का? कंपनीला कोणाचे तरी संरक्षण आहे का? ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचं सांगितलं जात आहे. ही भीती मी पाच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती, ती शक्यता खरी ठरतेय, असं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी संशय व्यक्त केला जातोय. विमान दुर्घटना कशी घडली याचा उलगडा ब्लॅक बॉक्समधून होईल असं म्हटलं जात होतं. मात्र आता ब्लॅक बॉक्स जळला असल्याचं सांगितलं जात आहे. हा दावा धक्कादायक आहे. कारण अपघातातील आग मर्यादित होती. हे ११००°सी तापमानात 1१ तास, तर २६०°सी तापमानात १० तास तग धरू शकते. त्यामुळे ब्लॅकबॉक्सचे जळणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. तरीही असे घडले असेल तर ही तांत्रिक चूक की घातपात, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
विमान अपघातांमध्ये, ब्लॅक बॉक्स, ज्यामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतो, तो अत्यंत मजबूत धातूचा बनलेला असतो. तो अति उष्णतेमध्येही सुरक्षित राहतो, ज्यामुळे मोठ्या आगीत किंवा टक्करमध्येही डेटा सुरक्षित राहतो. मात्र बारामत अपघातात, संपूर्ण विमान आगीत जळून खाक झाले होते आणि ब्लॅक बॉक्सचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.
सध्या या अपघाताची सीआयडी तसेच डीजीसीए (नागरी विमान वाहतूक संचालनालय), एएआयबीमार्फत (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) चौकशी सुरू आहे. एएआयबीने म्हटले आहे कि अपघातग्रस्त विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसविण्यात आले होते. मात्र, अपघाताच्या वेळी दोन्ही रेकॉर्डरचे दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्याने आगीमुळे मोठे नुकसान झाले. विमानातील डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर एएआयबीच्या प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला आहे. त्यामुळे अपघाताच्या आधीची उड्डाणातील तांत्रिक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, तर हनीवेल कंपनीने तयार केलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरची सखोल तपासणी सुरू आहे. डेटा पुनर्प्राप्तीसाठी संस्थेने अमेरिकेकडे विशेष सहाय्य मागितले आहे.




