मुंबई – अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान याच अध्यक्षपदाच्या निवडीवरून रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षा व्हाव्यात यासाठी केवळ ३५ आमदारांनीच सह्या केल्या आहेत, असा दावा रोहित पवारांनी केलाय, इतर आमदारांनी का सह्या केल्या नाहीत, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला विरोध करणारे ते आमदार कोण? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
रोहित पवार म्हणाले कि सुनेत्राकाकी राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही. ३५ आमदारांनी सह्या केल्या आहेत, असं आम्हाला कळंतय. ते ३५ आमदार कोण आहेत? त्या ३५ आमदारांमधील एकाला जरी विचारलं तरी तुम्हाला याबाबत स्पष्टपणे सांगतील. सर्वच पदाधिकाऱ्यांनी सुनेत्राताईंच्या निवडीसाठी सह्या केल्यात, असं नाही. ठराविक मेजॉरिटीत पदाधिकाऱ्यांनी सुनेत्राकाकींसाठी सह्या केल्या आहेत. ज्यांनी सह्या केल्या आहेत, त्यांना तुम्ही विचारा. ज्यांनी सह्या केल्या नाहीत? त्या कशामुळे केल्या नाहीत? ते आमदार कोण आहेत. ते पदाधिकारी कोण आहेत? हा खरा संशोधनाचा विषय आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
येत्या 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत निवड होणार असल्याचे संकेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले होते. मात्र, तत्पूर्वीच रोहित पवार यांनी केलेल्या विधानामुळे पक्षातील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप काही स्तरांतून होत असतानाच, रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न या संशयाला बळ देणारे ठरत आहेत.
यावेळी रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरही भाष्य केले. अजित पवार हयात असताना त्यांना दोन्ही पक्ष आणि कुटुंब पुन्हा एकत्र यावे, अशी तीव्र भावनिक इच्छा होती. दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित दादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात अनके बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं.
अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते. त्यादृष्टीने चर्चा होत होत्या. पण आज दादा राहिले नाहीत, दोन्ही पक्ष कुटुंब एकत्र यावेत असं त्यांना वाटत होते, असा दावा रोहित पवार यांनी केला होता.




