फिरोजाबाद – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात एका आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोस्टचा निषेध करण्यासाठी आलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांसोबत झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. या दरम्यान ग्रामस्थांनी बलजंग दलाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. परिस्थिती अशी निर्माण झाली कि जीव वाचवण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना शेतात पळून जावे लागले.
ही घटना गेल्या महिन्यात नरखी पोलिस स्टेशन परिसरातील दौरी गावात घडली. दौरी गावातील रहिवासी रसीद यांनी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला. या निषेधार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गावात पोहोचून निदर्शने करण्याचा निर्णय घेतला.
बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष शुभम प्रताप सिंह यांनी संघटनेचे अधिकारी आणि कार्यकर्ते दौरी गावात पोहोचले. परिस्थिती लक्षात येताच, नरखी पोलिस ठाण्याचे एक उपनिरीक्षक आणि अनेक पोलिसही घटनास्थळी उपस्थित होते. आक्षेपार्ह पोस्टबाबत चर्चा सुरू असताना दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला. यानंतर दगडफेक झाली, ज्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. यानंतर जमावाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. या दरम्यान बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते आपला जीव वाचवण्यासाठी शेतात पळून गेले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले.
त्यानंतर राजावली पोलिस ठाण्यातून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पाठवण्यात आला. सीओ टुंडला अमरीश कुमार यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत हंसरामगढी येथील रहिवासी केके तिवारी यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगडफेकीनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते नरखी पोलिस ठाण्यात पोहोचण्यात यशस्वी झाले, जिथे हिंदू संघटनांचे इतर नेते आणि कार्यकर्तेही जमू लागले. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व पक्षांशी चर्चा करून परिस्थिती शांत केली. घटनेनंतर दोरी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




