नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका खाजगी रुग्णालयात मोतीबिंदूचे ऑपरेशन केल्यानंतर नऊ रुग्णांचे डोळे काढावे लागले असून आणि नऊ जणांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. यानंतर त्यामुळे अधिकाऱ्यांनी रुग्णालय सील करून चौकशीचे आदेश दिले.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की १ फेब्रुवारी रोजी न्यू राजेश हाय-टेक रुग्णालयात आयोजित नेत्र शिबिरात ३० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर २४ तासांच्या आत अनेक रुग्णांनी शस्त्रक्रिया केलेल्या डोळ्यातून तीव्र वेदना आणि पू बाहेर पडण्याच्या तक्रारी सुरू केल्या. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की किमान १८ रुग्णांना संसर्ग झाला आणि त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दिल्ली, लखनऊ आणि वाराणसी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की एका रुग्णाची नंतर अंशतः दृष्टी वापस आली.
जिल्हा दंडाधिकारी दीपक मीणा म्हणाले की रुग्णालय सील करण्यात आले आहे आणि दंडाधिकारी चौकशी सुरू करण्यात आली आहे. जर कोणी दोषी आढळले तर त्यांची नोंदणी रद्द केली जाईल. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश झा यांनी याला ‘गंभीर चूक’ म्हटले आणि तपास अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले.
आरोग्य विभागाने केलेल्या कल्चर चाचण्यांमध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गाची पुष्टी झाली. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णांचा आरोप आहे की त्यांना शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच डिस्चार्ज देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशीच त्यांना गुंतागुंत निर्माण झाली.
सर्वात जास्त बाधित रुग्णांपैकी काही रुग्णांवर दिल्लीतील एम्स आणि वाराणसी आणि लखनऊ येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की अनेक प्रकरणांमध्ये, संसर्ग आणखी पसरू नये म्हणून डॉक्टरांना संक्रमित डोळा काढून टाकावा लागला.
बाधित रुग्णांपैकी एक परदेशी यांनी सांगितले की १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील एम्स येथील डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांची शस्त्रक्रिया केलेल्या डोळ्यातील दृष्टी गेली आहे. डॉक्टरांनी परदेशी यांना सांगितले की अहवालाच्या आधारे, डोळा काढावा लागू शकतो, गोला येथील सेहवान अली यांनी सांगितले की शस्त्रक्रियेनंतर एका दिवसात त्यांची प्रकृती आणखी बिकट झाली. दुसऱ्या दिवशी माझ्या डोळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. आम्हाला ताबडतोब दिल्लीला नेण्यात आले. डॉक्टरांनी माझा एक डोळा काढला. आता मला दिसत नाही.
वाराणसीतील रुग्णालयात एक डोळा काढून टाकलेल्या राधौली येथील शंकरवती म्हणाल्या की त्यांना दुसऱ्या डोळ्यातील दृष्टी जाण्याची भीती आहे. मला अजूनही वेदना होत आहेत आणि दृष्टी अंधुक आहे. मला संसर्ग पसरण्याची भीती आहे. ती म्हणाली कि माझ्या मुलाने इशारा दिला की जर तिच्या उर्वरित डोळ्यावरही परिणाम झाला तर तो कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण प्रकरणात आता कुटुंबीयांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




