बीड – सावकाराच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बीडमध्ये व्याजाने दिलेले पैसे परत कर म्हणत एका तरूणाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. तर सावकाराच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. बीडमधील ही धक्कादायक घटना आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गावंदरा येथील धर्मराज बडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. माहितीनुसार, धर्मराज बडे यांनी काही दिवसांपूर्वी बालासाहेब कांबळे यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी कांबळे हे बडे यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी पैशांसाठी तगादा लावत कुटुंबीयांविषयी अपमानास्पद व अश्लील शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.आहे. या प्रकारामुळे धर्मराज बडे मानसिक तणावात होते.
त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणून जोपर्यंत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असे म्हणत आंदोलन सुरू केले आहे.
जवळपास ५ तास पोलीस ठाण्यासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेत बालासाहेब कांबळे, कांताबाई कांबळे आणि भागवत वेताळ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले आहे. राज्यात सावकाराच्या त्रासामुळे अशा घटना वाढत आहेत.




