सोलापूर – जिल्ह्यात १० वीच्या परीक्षेत १० बोगस विद्यार्थी सापडले आहेत. त्यामध्ये ९ विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. याप्रकरणात केंद्रप्रमुखाच्या तक्रारीनंतर पोलीस कारवाई करण्यात आली आहे. राज्यात एसएससी १० वी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी कॉपीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शासनाच्या कॉपीमुक्त अभियान सूरू असताना हा कॉपीप्रकार घडला आहे.
दहावीच्या परीक्षेच्या भरारी पथकाकडून परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणावरुन विद्यार्थ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढ्यात वेगळाच हा प्रकार समोर आला आहे. येथे दहावीच्या परीक्षेत मराठी पेपरला मंगळवेढा तालुक्यात १० बोगस विद्यार्थी परीक्षेला बसलेले सापडले आहेत. या बोगस विद्यार्थ्यांवर केंद्र प्रमुखांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर येथे दहावीच्या परीक्षेत १० बोगस विद्यार्थी सापडले आहेत, तर त्यामध्ये ९ विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. मंगळवेढ्यातील सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी या शाळेतील विद्यार्थी नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात परीक्षेसाठी होते.
10 वीची परीक्षा सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांची ओळखपत्र तपासणी करताना १० बोगस विद्यार्थी आढळून आले आहेत. या १० विद्यार्थ्यांवर केंद्र प्रमुखांनी बोर्डाच्या नियमानुसार कडक कारवाई केली आहे, व कायदेशीर पोलीसात तक्रार दिली आहे, अशी माहिती केंद्रसंचालक विट्ठल एकमल्ली यांनी दिली आहे.




