अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब, १० वरून १५ टक्क्यांपर्यंत वाढ, जगभऱ्यातील राजकीय वातावरण तापले

SHARE:

अमेरिका – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार युद्धात मोठी ठिणगी टाकली आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसल्यानंतर अवघ्या २४ तासांत ट्रम्प यांनी आक्रमक पाऊल उचलत जागतिक आयात शुल्क १० टक्क्यांवरून वाढवून १५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ‘ट्रुथ सोशल’ वर या निर्णयाची घोषणा करत त्यांनी संपूर्ण जगाला हादरा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारला

शुक्रवारी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या आणीबाणीच्या अधिकारांतर्गत टॅरिफ लावण्याच्या अधिकारावर मर्यादा आणणारा निकाल दिला होता. मुख्य न्यायमूर्ती जॉन रॉबर्ट्स यांनी स्पष्ट केले होते की, टॅक्स लावण्याचे अधिकार संविधानाने संसदेला दिले आहेत, राष्ट्राध्यक्षांना नाही. मात्र, या निर्णयाला ‘हास्यास्पद’ आणि ‘अमेरिकाविरोधी’ संबोधत ट्रम्प यांनी तातडीने १५ टक्क्यांची वाढ लागू केली.

१५० दिवसांचे ‘डेडलाईन’ अस्त्र

ट्रम्प यांनी १९७४ च्या व्यापार कायद्यातील कलम १२२ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर केला आहे. हा कायदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना देयकांच्या संतुलनातील समस्या सोडवण्यासाठी शुल्क लावण्याची परवानगी देतो. तथापि, हे आदेश केवळ १५० दिवसांसाठी वैध राहतील. या कालावधीनंतर हे शुल्क सुरू ठेवायचे असल्यास अमेरिकन काँग्रेसची मंजुरी आवश्यक असणार आहे.

“अमेरिका अनेक दशकांपासून लुटली जातेय”

आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इतर देशांवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “अनेक देश अनेक दशकांपासून अमेरिकेची लूट करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयाचा सखोल अभ्यास केल्यानंतर, मी राष्ट्राध्यक्ष म्हणून तातडीने प्रभावाने आयात शुल्क १० टक्क्यांवरून कायदेशीररित्या वैध असलेल्या १५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहे. यामुळे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही मोहीम अधिक यशस्वी होईल.”

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम –

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. भारत, चीन आणि युरोपीय देशांमधून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर आता १५ टक्के अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची आणि व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा