फरार कृष्णा आंधळे तिनदा गावात येऊन गेला, दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा दावा

SHARE:

बीड – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या बद्दल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सनसनाटी दावा केला आहे. कृष्णा आंधळे आतापर्यंत तिनदा गावात येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपी कृष्णा आंधळेबाबत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. कृष्णा आंधळे एकदा-दोनदा नव्हे तर तीन वेळा आपल्या गावी येऊन गेला. कुटुंबाला भेटून गेला, याची सीआयडीलाही माहिती आहे. मग तो पोलिसांना सापडत कसा नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे.

कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, मात्र त्याला जेलबंद कसे करायचे याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला या आरोपी पासून धोका आहे. हे आरोपी शैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्याची दिंड जिल्हाभरात काढावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. काल बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली. याच सुनावणी वेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिलीय.
कालच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी पक्षाला सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. या अर्जावर सरकारी पक्ष आपले लेखी म्हणणे मांडणार आहे.

तसेच विष्णू चाटेच्या जेल बदलीच्या अर्जावर आज ऑर्डर येण्याची शक्यता आहे. तर आरोपी जयराम चाटेकडून वकील बदलला आहे. नवीन वकील एम के वाघीरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, कोर्टाकडून प्रतीक घुलेला विचारणा करण्यात आली कि वकील लावायचा आहे का? यावर प्रतीक घुलेकडून उत्तर देण्यात आलं आणिपुढील दहा ते पंधरा दिवसात घरचे लोक वकील बघतील असं सांगण्यात आलं.

आरोपी वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी सरकारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लॅपटॉपची क्लोन कॉपी, फॉरेन्सिक अहवाल आणि पेन ड्राईव्ह अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याशिवाय साक्षीदारांची यादी स्वीकारू नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. तसेच, सरकारी पक्ष घाई का करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारी पक्षाला दोषारोप पत्र एकदाच पूर्ण दाखल करायला सांगा. असे म्हणत आरोपी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी मागणी केली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार आहे.

येत्या २६ तारखेला सर्वोच्च न्यायालयात वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाने आधीच ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी म्हटलं. मागील दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचेही ते म्हणाले. आता या खटल्यात आरोपींना कधी शिक्षा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा