अहिल्यानगर – शिर्डीमध्ये साई मंदिरात वेषांतर करुन चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या चोरीच्या प्रकरणात महिलांचा समावेश असलेली ही टोळी, शिर्डीमधील साई मंदिरात भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीत मिसळत होती. साई मंदिरात चोरीसाठी पर्स ब्लेडने कापण्याची पद्धत वापरली जात होती. अहिल्यानगर मधील साई मंदिर परिसरात कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळत चोरी करणार्या आंध्र प्रदेशातील एका चोरी करणार्या टोळीचा शिर्डी पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
या कडक कारवाईत २ महिला, एक पुरुष आणि एका अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आले आहे. आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापून चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. शिर्डी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासात काही महिला आणि पुरुष संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले आहेत. मंदिर परिसरात सीसीटीव्हीतून हा प्रकार उघड झाला आहे.
मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित व्यक्ती वारंवार कपडे बदलून मंदिर परिसरात फिरताना दिसले आहेत. महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस परिधान केला होता, त्यानंतर साडी नेसून पुन्हा गर्दीत वावरल्याचे दिसून आले. या वेशांतरामुळे शिर्डी पोलीस आणि मंदिर सुरक्षारक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता. संशयित हालचालींच्या आधारे या आरोपींना अटक करण्यात आले आहे. मात्र, कारवाईत एक पुरुष आरोपी फरार झाला आहे.
एक पुरुष, २ महिला आणि एक अल्पवयीन बालक यांना पोलिसांनी मंदिर परिसरात पकडले. पोलिसांनी त्यांची तपासणी केल्यावर आरोपींकडून १० मोबाइल फोन, ११७० रुपये रोख रक्कम, ब्लेडस आणि कटर जप्त करण्यात आले आहे. अल्पवयीन बालकाकडूनही एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे. बालकाला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे. शिर्डी मंदिर परिसरात ही चोरी करणारी टोळी भाविकांसारखाच कपडे परिधान करून गर्दीत मिसळत होती.
चोरीसाठी पर्स ब्लेडने कापण्याची पद्धत वापरली जात होती. त्यांच्या या पद्धतीमुळे पोलिसही काही काळ अचंबित झाले होते. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे मंदिर परिसरातील चोरी करणार्या टोळीला पकडण्यात आले आहे. शिर्डीतील साई मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणात अधिक तपास शिर्डी पोलिस करत आहे.




